गुन्हे रोखण्यासाठी 'एआय एमएल लॅब'; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून देशातील दुसऱ्या लॅबचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 09:34 IST2025-02-19T09:33:32+5:302025-02-19T09:34:34+5:30
लोकांच्या थेट तक्रारीसाठी १९३० हा हेल्पलाईन क्रमांक असणार आहे.

गुन्हे रोखण्यासाठी 'एआय एमएल लॅब'; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून देशातील दुसऱ्या लॅबचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'सायबर फ्रॉड' हे देशात सर्वाधिक वाढणारे गुन्हे आहे. राज्यातील लोकांना त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. एआय एमएल लॅबचे आज अनावरण करण्यात आले असून, असे लॅब असणारे गोवा हे देशातील दुसरे राज्य आहे. केवळ पंजाब सरकार या लॅबचा वापर करीत आहे. त्यामुळे आता यातून सायबर गुन्हे निश्चितच कमी होतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांगितले.
पोलिस खात्यातर्फे सायबर क्राईम विभागाच्या साहाय्याने मंगळवारी सायबर गुन्हे कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर क्वीक पास, सायबर योद्धा, एआय एमएल लॅब, आणि १९३० हेल्पलाईन क्रमांक या उपक्रमांचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस महासंचालक आलोक कुमार, पोलिस महानिरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.
आतापर्यंतची कारवाई
आतापर्यंत सायबर क्राईम विभागातर्फे १५५ बेकायदेशीर वेबसाईट, २५ फेक सोशल मीडिया अकाऊंट, आणि ४६६ मोबाईल क्रमांक ब्लॉक केले आहे. लोकांनी आताच सावधगिरी बाळगली नाही, तर ही संख्या वाढणार आहे. संख्या वाढली तरी भीती नाही, परंतु लोकांना न्याय मिळणे आवश्यक आहे.
दरमहा १० कोटींना गंडा
राज्यात प्रती महिना सरासरी १० कोटी रुपयांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत आहे. यावर उपाय म्हणजे सायबर गुन्हेगारांच्या प्रलोभनांना बळी पडलेल्या लोकांनी पुढाकार घेत तक्रारी केल्या पाहिजे, तरच गुन्ह्यांचा छडा लागू शकतो. आम्ही आवाहन करून देखील लोक आमिषाला बळी पडतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एआय लॅबमुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. क्वीक पास हे क्युआर कोड संदर्भातील उपक्रम आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण यातून येऊ शकते. सायबर योद्धा हे लोकांमध्ये जागृती करण्याच्या अनुषंगाने आणले आहे. लोकांच्या थेट तक्रारीसाठी १९३० हा हेल्पलाईन क्रमांक असणार आहे. यातून राज्यातील बऱ्यापैकी सायबर फसवणूक गुन्हे कमी होतील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.