पाच वर्षांत २५ हजार लिटर दूध उत्पादन वाढविण्याचे ध्येय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 12:35 PM2024-05-17T12:35:49+5:302024-05-17T12:36:27+5:30
गोमांचल डेअरीशी संबंधित शेतकऱ्यांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : राज्याला दरदिवशी साडेचार लाख लिटर दुधाची आवश्यकता आहे. तर गोव्यात केवळ ६० हजार लिटर इतकेच दूध उत्पादित होते. येणाऱ्या काळात डेअरी फार्ममध्ये दूध उत्पादन वाढविण्यासाठी कुडणेतील गोमांचल डेअरीने संकल्प केला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये साखळी मतदारसंघात २५ हजार लिटर दूध उत्पादनाचे ध्येय आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे दिली.
कुडणे येथील गोमांचल डेअरी व डतर शेतकरी व दध उत्पादकांची एक बैठक साखळीतील रवींद्र भवनात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह सुभाष मळीक, सल्लागार म्हणून नेमण्यात आलेले बालाजी रेड्डी आदी उपस्थित होते.
गोमांचल डेअरीशी संलग्नित असलेल्या दूध उत्पादकांना या उत्पादनात मार्गदर्शन व सर्व प्रकारचे सहकार्य, मदत मिळावी यासाठी बंगळुरू येथील बालाजी रेड्डी यांची या डेअरीचे सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागाराचा लाभ गोमांचल डेअरीशी संलग्नित असलेल्या दूध उत्पादकांबरोबरच इतरही दूध उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावा. येणाऱ्या काळात दूध उत्पादनात साखळी मतदारसंघाचे नाव पुढे आणण्यासाठी या सल्लागाराचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या डेअरीशी संलग्नित व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन वाढवून आर्थिकदृष्ट्या बळकट बनविण्यासाठी तसेच या क्षेत्रातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन गायी खरेदी, गायींना वैद्यकीय उपचार, पशुखाद्य यांचा पुरवठा केला जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी या सल्लागारांकडे पथक असून त्या पथकाद्वारे योग्य मार्गदर्शन व सर्व काही मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, याचा लाभ साखळी मतदारसंघातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबैठकीला परिसरातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही आपल्या समस्या यावेळी मांडल्यात.