राज्यातील शाळा प्रवेशसुलभ बनवण्याचे ध्येय: समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई
By समीर नाईक | Published: August 11, 2023 05:16 PM2023-08-11T17:16:26+5:302023-08-11T17:16:56+5:30
ही उद्दिष्टपूर्ती साधण्यास या सर्वेक्षणाची मोठी मदत होईल, अशी अपेक्षा फळदेसाई यांनी व्यक्त केली.
समीर नाईक, पणजी: आम्ही सर्वसमावेशक शिक्षणासाठी गोव्याला आदर्श राज्य बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे कर्मचारी आमच्या या प्रयत्नांचा कणा आहेत. आम्हाला आशा आहे की, शाळांमध्ये प्रभावी प्रवेशयोग्यता सर्वेक्षण करण्यासाठी ही अभिमुखता कार्यशाळा आवश्यक कौशल्य आणि ज्ञान उपलब्ध करत मदत करेल. राज्यातील शाळा प्रवेशसुलभ बनवण्याचे ध्येय आहे, असे मत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
गोवा राज्य समाज कल्याण संचालनालय आणि गोवा राज्य दिव्यांग आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पणजी-पाटो येथील कला आणि संस्कृती बहुउद्देशीय सभागृहात शाळेतील प्रवेशसुलभता या विषयावर अभिमुखता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री सुभाष फळदेसाई बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, उपसंचालक मनीष केदार आणि मनोरुग्ण सामाजिक कार्य विषयातील सहायक प्राध्यापक सुदेश गावडे उपस्थित होते.
शिक्षणामध्ये सर्वसमावेशकता आणि समान प्रवेशसुलभता वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले गेले आहे. या कार्यशाळेमध्ये राज्यातील ४५० शाळांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रक्षेत्र सहाय्यक आणि प्रक्षेत्र कर्मचारी यांचे क्षमतावर्धन करणे हा उद्देश होता. तसेच शिक्षणाचा लाभ घेण्यामध्ये एकही मूल मागे राहणार नाही ही उद्दिष्टपूर्ती साधण्यास या सर्वेक्षणाची मोठी मदत होईल, अशी अपेक्षा फळदेसाई यांनी व्यक्त केली.
प्रवेशयोग्यता हा विशेषाधिकार नाही, तर हक्क आहे.राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे शारिरीक क्षमतेकडे न पाहता, दर्जेदार शिक्षणासाठी समान प्रवेश मिळावा याची आम्ही प्रयत्न करत आहाेत. यासाठी अभिमुखता कार्यशाळा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे गुरुप्रसाद पावसकर यांनी यावेळी सांगितले.
पुण्यातील डिझाइन ब्रिज डायव्हर्सिटी अँड इनक्लुजन फाऊंडेशनया स्वयंसेवी संस्थेची संकल्पना आणि आयोजन व्यवस्थापन असलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागींना आवश्यक सर्वेक्षण कौशल्य प्रदान करण्यावर भर दिला गेला.