मद्यपी पर्यटकांना अटक होणार, किनाऱ्यांवर पोलिसांचीही नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 07:04 PM2019-11-12T19:04:07+5:302019-11-12T19:05:00+5:30
'सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हाच आहे.'
पणजी : राज्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आयआरबीचे काही पोलिसही नियुक्त केले जातील. सार्वजनिक ठिकाणी जे पर्यटक दारू पितात व अन्य उपद्रव करतात, त्यांना यापुढे अटक केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे दिला.
अलिकडे वारंवार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू होत आहे. किनाऱ्यांवर जीवरक्षक असूनही सात पर्यटकांचा या मोसमात मृत्यू झाला तर सुमारे 135 पर्यटकांना बुडताना वाचविले गेले आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की आपण बैठक घेतली व स्थितीचा आढावा घेतला आहे.
परवा बेळगावच्या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांना समुद्रात उतरू नका, कारण समुद्र खवळलेला आहे, अशी सूचना जीवरक्षकांनी केली होती. पण ते समुद्रात उतरलेच. काहीजण मद्य पिऊन समुद्रात उतरतात व जीव गमावून बसतात. ज्यांनी कधी समुद्रच पाहिलेला नसतो ते समुद्रकिनारा पाहून खूप बेपर्वा वागतात.
मुख्यमंत्री म्हणाले, की सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हाच आहे. अशा पर्यटकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचना आपण पोलिसांना केली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणा-यांना अटकच होईल. पूर्वी अशी मोहीम राबवली गेली होती, आता नव्याने कारवाई व्यापक केली जाईल. तसेच ज्या किना-यांवर जीवरक्षकांसोबत आयआरबीचे अतिरिक्त पोलिसही नियुक्त करण्याची गरज आहे, अशा काही ठिकाणी पोलिसांचीही नियुक्ती केली जाईल.
सर्वच किना-यांवर पोलीस नियुक्त करता येणार नाहीत पण ज्या जागा धोकादायक आहेत, तिथे आयआरबीचे पोलीस निश्चितच नियुक्त होतील. सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांनी कोणताच उपद्रव करू नये व जीवरक्षकांच्या सूचना ऐकाव्यात असे अपेक्षित आहे.