अपंगासाठी बाणावली मतदार संघातील सर्व समुद्र किनारे सुलभ करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 03:13 PM2023-10-21T15:13:32+5:302023-10-21T15:13:40+5:30
आपचे आमदार वेंझी व्हिएगास यांचे आश्वासन
नारायण गावस
पणजी: बाणावली मतदारसंघातील सर्व समुद्र किनारे हे राज्यातील अपंगांना वापरण्यास योग्य केले जाणार आहे. तसेच अपंगासाठी खास बाणावली मतदारसंघात नाताळापूर्वी कार्यालय दिले जाणार असे आश्वासन बाणावलीचे आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगास यांनी दिले. डिसाबिलीटी राईट्स असोसिएशन ऑफ गोवा (ड्रॅग) या संघटनेच्या २० व्या स्थापना दिनानिमत्त पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. यावेळी त्यांच्या सोबत गोवा राज्य अपंग आयोगाचे आयुक़्त गुरुप्रसाद पावसकर तसेच ड्रॅग या संघटनेचे अध्यक्ष ॲवलिनो डिसा व इतर सदस्य उपस्थित होते.
आज राज्यात अपंगाना अनेक अडचणी आहेत. सरकारकडून त्यांच्या सर्व अडचणी समस्या साेडविल्या जात नाही. राज्यातील अपंगाना अनेक पर्यटन स्थळे तसेच सरकारी कार्यालयात जाण्यासाठी लिफ्टची साेय नसते. त्यांना अशा विविध ठिकाणी जाता येत नाही. समुद्र किनारी अपंगाना जाण्यासाठी साेय नाही म्हणून आमदार निधीतून किंवा सीएसआर मार्फत बाणावली मतदार संघातील सर्व समुद्र किनारे अपंगाना जाण्यास याेग्य केले जाणार आहे, असे आमदार वेंझी व्हिएगास म्हणाले.
आमदार झाल्यापासून अपंगाच्या अनेक समस्या मांडल्या आहेत. अधिवेशनात अनेक समस्या मांडल्या आहेत. पण राज्यातील अंपगाना योग्य सुविधा या सरकारकडून मिळत नाही. म्हणून बाणावली मतदारसंघात अशा विविध सुविधा अपंगाना पुरविल्या जाणार आहे. तसेच सरकारला या विषयी अपंगाना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहे, असे आमदार वेंझी व्हिएगास यांनी सांगितले.
अपंगासाठी विविध उपक्रम
राज्यात अपंगासाठी विविध उपक्रम राबविले जातात सरकारचा याला पाठींबा आहे. त्याचप्रमाणे विविध बिनसरकारी संस्थाचाही पाठींबा मिळत आहे. अपंगासाठी गेल्या वर्षी पर्पल फेस्टीवल साजरा केला. याचा चांगला प्रसिद्धी मिळली. आता पुढच्या वर्षी माेठ्य प्रमाणात हा फेस्टीवल साजरा केला जणार आहे, असे गोवा राज्य अपंग आयाेगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले.