गोव्यात आता सर्व सरकारी प्रकल्प हरीत, विजय सरदेसाई यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 09:46 PM2018-11-14T21:46:17+5:302018-11-14T21:47:00+5:30
गोव्यात यापुढे साकारले जाणारे सर्व सरकारी प्रकल्प ‘हरीत प्रकल्प’ असतील अशी घोषणा गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी आज बुधवारी केली.
मडगाव: गोव्यात यापुढे साकारले जाणारे सर्व सरकारी प्रकल्प ‘हरीत प्रकल्प’ असतील अशी घोषणा गोव्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी आज बुधवारी केली. सरकारने या धोरणाला तत्वत: मान्यता दिली असून, लवकरच याबद्दल कायदा तयार करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव येथील बोर्डा भागातील आयटीआय व मल्टीपर्पज हायरसेंकडरी स्कूल इमारतीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाच्या पायाभरणीच्या नामफलकाचे आज बुधवारी सरदेसाई यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
हरीत प्रकल्प ही पर्यावरण जतन करण्यासाठी काळाची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. पुढील पिढीसाठी काहीतरी चांगले दयायचे असेल तर त्याला आतापासूनच सुरुवात होणे गरजेचे आहे असे मंत्री सरदेसाई म्हणाले. पुढील पिढीसाठी विकास महत्वाचा आहे असे ते म्हणाले.
सामान्य माणसांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत. चांगला गोवा बनवायचा असेल तर चांगले शिक्षणही उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. येथील मल्टीपर्पज इमारतीचे दोन टप्प्यात काम होणार असून, आज पहिल्या टप्प्याच्या कामाचा नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. पंचवीस कोटी रुपयांचा खर्च करुन बांधण्यात येणारी ही इमारत वर्षभरात पूर्ण होईल. गोवा पायाभूत साधन सुविधा महामंडळातर्फे हे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. येथे फुटबॉल व क्रिकेटसाठी मैदान उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचेही मंत्री सरदेसाई यांनी आभार मानले. आम्ही सरकार घडविले ते विकासकामाचे स्वप्न साकारावे यासाठी आहे. फातोर्डा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. विरोधात असतानाही आपण अनेक विषय मांडले होते. मात्र कामे झाली नाही. आम्ही प्रत्येकवेळी विकासासंबधीचे अनेक विषय लावून धरले होते. दहा वर्षात भाजपा आमदारांनी ज्याचा विचारही केला नाही ते आम्ही करुन दाखविले आहे. बाहय विकास आराखडा हा केवळ बिल्डरांसाठी आहे असे कुणी मानून घेऊ नये. सर्वसामान्यांनाही या आराखडयाचा लाभ होईल असेही ते म्हणाले.