सरकारी जमिनी बळकावून बांधलेली सर्व घरे पाडणारच! मुख्यमंत्री सावंत यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:35 AM2023-12-28T11:35:24+5:302023-12-28T11:35:39+5:30
मयेतील २१५ भूमिपुत्रांना सनद वितरण.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जमिनींचे सर्व प्रश्न निकालात काढण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र सरकारी मालकीच्या जमिनी विकून त्यावर ज्यांनी घरे बांधली असतील ती निश्चितच पाडली जातील. त्यामुळे जमीन बळकावण्याचा नादात कुणी पडू नये, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
मये येथील सातेरी मंदिरात काल, बुधवारी २१५ भूमिपुत्रांना सनदांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार प्रेमेंद्र शेट, उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, प्रेमानंद म्हांबरे, शंकर चोडणकर, सरपंच विद्याधर करबोटकर, महेश सावंत, दिलीप शेट, भूविमोचन समितीचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर यांच्यासह मयेचे समय्ध उपस्थित होते. मरो येथील जमिनींचा प्रश्न सुटला आहे. आता शेत जमिनीचा प्रश्नही निकालात काढून मयेवासीयांना न्याय देण्यात येणार आहे. एकाच माणसाला दोन सनद मिळणार नाहीत. तसेच जे शिल्लक दावे आहेत त्यासाठी कुटुंबीयांनी सहकार्य करावे, उर्वरित सनदांचे लवकरच वाटप होईल, तसेच मयेतील सरकारी जमिनीत मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी नियोजन करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, सरकारच्या सहकार्याने मये मतदारसंघात मोठी विकास कामे होत आहेत. प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. अनेक त्रुटी दूर करून अमिनीचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मोठे योगदान दिले आहे. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष सहकार्य
देण्याचे आवाहन केले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांचे स्वागत शंकर चोडणकर यांनी केले. नारायण नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास चोडणकर यांनी केले.