पर्पल फेस्टमध्ये होणार अखिल भारतीय वधू वर मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 06:06 PM2023-12-07T18:06:51+5:302023-12-07T18:07:43+5:30
विविध प्रकारच्या दिव्यांगाना मनपसंत जोडीदार शोधता यावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
नारायण गवस
पणजी : जानेवारी महिन्यात होणाऱ्या पर्पल फेस्टचाच एक भाग म्हणून १० जानेवारी रोजी अखिल भारतीय वधू वर मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. विविध प्रकारच्या दिव्यांगाना मनपसंत जोडीदार शोधता यावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
हा सोहळा गोवा सरकारचे समाज कल्याण खाते, दिव्यांगजन आयोग, केंद्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण खाते, व्हॉइस व्हिजन आणि बासुदेव बुबना मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
पर्वरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री फळदेसाई यांनी दिव्यांगांसाठी अशा प्रकारच्या वधू वर मेळाव्यांची गरज अधोरेखित केली. आपले अनुभव आणि आपल्या समोरील आव्हाने समजून घेणाऱ्या समविचारी व्यक्तींना या निमित्ताने भेटता येणार आहे. दिव्यांगजनांचे जाळे त्या निमित्ताने विस्तारणार आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत गोवा राज्य दिव्यांग आयाेगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर व इतर सदस्य उपस्थित होते.
व्हॉइस व्हिजनने आतापर्यंत अशा प्रकारचे ११ वधू वर मेळावे आयोजित केले आहेत. आतापर्यंत दिव्यांग व दिव्यांग नसलेले यांच्या वधू वर मेळाव्यातून ८७० संभाव्य वधू वरांना एकत्रित आणण्याचे काम त्यांनी केले आहे. व्हॉइस व्हिजनच्या संस्थापक सुश्मीता बुबना म्हणाल्या, "विवाहामुळे दिव्यांगांसह प्रत्येकाचाच आपल्या आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरू होतो. आमच्या या मेळाव्यामुळे दिव्यांग व्यक्तींना आपले विवाहाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे".