मगोपच्या सर्व समित्या विसर्जित: दीपक ढवळीकर, सरकार-सत्ताधारी आमदाराविरोधात बोलल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 01:16 PM2024-02-05T13:16:10+5:302024-02-05T13:16:25+5:30

नरेश सावळ यांचा राजीनामा स्वीकारला, दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना पाठिंबा

all magopa committees dissolved said deepak dhavalikar | मगोपच्या सर्व समित्या विसर्जित: दीपक ढवळीकर, सरकार-सत्ताधारी आमदाराविरोधात बोलल्यास कारवाई

मगोपच्या सर्व समित्या विसर्जित: दीपक ढवळीकर, सरकार-सत्ताधारी आमदाराविरोधात बोलल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पक्षाच्या कार्यकारी समित्या, मतदारसंघ समित्या तसेच महिला, युवा व इतर आघाड्या विसर्जित करण्याचा निर्णय शनिवारी मगोपच्या मगोपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा ठरावही करण्यात आला. माजी आमदार नरेश सावळ यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे, असे सांगण्यात आले.

समित्या विसर्जित केल्याने सर्व अधिकार आता केंद्रीय समितीकडे आले आहेत. केंद्रीय समितीचे सदस्य सोडून अन्य कोणीही सरकार किंवा सत्ताधारी आमदाराविरोधात बोलल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिला. ढवळीकर म्हणाले की, 'या समित्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला होता. तर काही समित्यांवरील पदाधिकारी पक्ष सोडून गेले आहेत. काही जण हयात नाहीत. त्यामुळे समित्या निष्क्रिय बनल्या होत्या. नरेश सावळ हेही कार्यकारी समितीवर होते. सध्या या समित्या विसर्जित केल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा त्या नव्याने गठीत केल्या जातील.'

नरेश सावळ यांनी राजीनामा सादर करताना पक्ष नेतृत्वावर जो हल्लाबोल केला होता, त्यावरही जोरदार चर्चा झाली, पत्रकारांनी विचारले असता ढवळीकर म्हणाले की, 'सावळ यांनी स्वार्थासाठी पक्ष सोडलेला आहे. ते गेले म्हणून पक्षाला काहीच फरक पडणार नाही. मगोपमध्ये आजवर अनेकजण आले आणि गेले. काहीजणांनी पक्ष विलीनही करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष टिकून आहे.

दरम्यान, मांद्रे पोलिस स्थानकाच्या उ‌द्घाटनाच्या कार्यक्रमास डावलल्याने स्थानिक सरपंच अमित सावंत यानी केलेल्या आंदोलनास पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे यांनी पाठिंबा दिल्याने व्यावर चर्चा याली मगोप भाजपसोबत सत्तेत असताना सरकारविरोधात चाललेल्या आंदोलनास गावडे यांनी पाठिंबा दिलाच कसा? असा प्रश्न उपस्थित झाला.

ढवळीकर यांना याबाबत 'लोकमत'ने विचारले असता माजी पंच म्हणून आपण पाठिंबा दिल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपले स्थानिक आमदाराशी आपले काहीच वैर नसल्याचेही त्यांनी सांगितल्याचे ढवळीकर म्हणाले. दरम्यान, पक्षाच्या महिला, युवा आघाड्याही लोकसभा निवडणुकीनंतर नव्याने गठीत केल्या जातील, असे ढवळीकर यांनी सांगितले.
 

Web Title: all magopa committees dissolved said deepak dhavalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.