म्हादईच्या आंदोलनास सर्व मंत्र्यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:31 PM2019-11-28T14:31:43+5:302019-11-28T14:33:19+5:30
म्हादई पाणीप्रश्नी चाललेल्या आंदोलनाला सर्व मंत्र्यांनी आपआपल्यापरीने प्रत्युत्तर देण्याची भूमिका स्वीकारली आहे.
पणजी : म्हादई पाणीप्रश्नी चाललेल्या आंदोलनाला सर्व मंत्र्यांनी आपआपल्यापरीने प्रत्युत्तर देण्याची भूमिका स्वीकारली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे म्हादई पाणीप्रश्न योग्य प्रकारे हाताळत आहेत व त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे गोव्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
म्हादई नदीचा उगम कर्नाटकात होतो पण या नदीचा बहुतांश भाग हा गोव्यातून वाहतो. गोवा व कर्नाटकमध्ये गेल्या काही वर्षापासून पाण्यावरील हक्कावरून वाद आहे. केंद्रीय पाणी तंटा लवादाने दिलेला निवाडा दोन्ही राज्यांना मान्य नाही व त्यामुळे निवाड्याला न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. मात्र केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला दिलेल्या एका पत्रमुळे गोव्यात येथील भाजप सरकारविरुद्ध जनआंदोलन सुरू झाले. म्हादई नदीचे पाणी वळवून कर्नाटक सरकार जो प्रकल्प उभा करू पाहत आहे, त्यास गोव्याचा विरोध आहे. पण जावडेकर यांच्या मंत्रालयाने त्या प्रकल्पाला मंजुरीचे पत्र दिले. म्हणजेच म्हादईचे पाणी वळवण्यासाठी मान्यता दिली. यामुळे विरोधी पक्षांनी व काही एनजीओंनी आंदोलन चालवले आहे. आंदोलकांनी मुख्यमंत्री सावंत यांना टीकेचे लक्ष्य बनवले आहे.
मात्र गोव्याचे जलसंसाधन मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, उपमुख्यमंत्री कवळेकर, वीज मंत्री निलेश काब्राल, विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो आदी एकूण आठ मंत्री एकत्र आले व त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्यावर आपला विश्वास जाहीर केला. मुख्यमंत्री सावंत हे म्हादई पाणीप्रश्नी गोव्याचे हित सांभाळत आहेत, म्हादईप्रश्नी शेवटी गोवाच जिंकेल असे हे मंत्री म्हणाले. काही विरोधी आमदार सत्तेतून बाहेर असल्याने वैफल्यग्रस्त होऊन ते म्हादईप्रश्नी राजकारण करत आहेत, असे आजगावकर म्हणाले.