पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार

By किशोर कुबल | Published: June 14, 2024 02:45 PM2024-06-14T14:45:34+5:302024-06-14T14:46:02+5:30

येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे.

All opposition parties will surround the government in monsoon session | पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार

पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार

पणजी : विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची सांगितले. रणनीती ठरवण्यासाठी लवकरच विरोधी आमदारांची लवकरच संयुक्त बैठक बोलावली जाईल.

येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. म्हादईचा प्रश्न अजून सुटलेल्या नाही. वाढती बेरोजगारी, महागाई नियंत्रणात येऊ  शकलेली नाही. भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. या सर्व प्रश्नांवर विरोधक एकत्रपणे सरकारला घेरणार आहे.
युरी म्हणाले की, आता निवडणुका झालेल्या आहेत. जनतेने कौल दिलेला आहे.

दक्षिण गोव्यातील पराभवाने लोकांची सरकारप्रती नाराजी दिसून आलेली आहे. विरोधक म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो. परंतु सरकार ते गंभीरपणे घेत नाही. दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. जाती, धर्माच्या प्रश्नावर मतदारांमध्ये फूट पाडण्याचे दिवस आता गेले. लोकांनी भाजपला जागा दाखवून दिलेली आहे.'
युरी पुढे म्हणाले की,' सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचतच नाहीत. राज्याची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. हे सरकार खाण व्यवसाय सुरू करू शकलेले नाही. भाजपने हुकुमशाही, दादागिरीची भाषा आरंभल्यानेच दक्षिण गोव्यातील लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

युरी म्हणाले की, ' गेल्या विधानसभा अधिवेशनाच्यावेळी चुकीचा पायंडा घालण्यात आला. पाच वर्षांपेक्षा अधिक जुनी माहिती दिली जाणार नाही,असे  जाहीर करण्यात आले. आरटीआय अर्ज केला तरी जुनी माहिती मिळते. त्यामुळे विधानसभेतच पाच वर्षांपूर्वीची माहिती का मिळू नये? विरोधी व सत्ताधाऱ्यांना प्रश्नोत्तराच्या तासाला समान संधी मिळाली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. या सर्व गोष्टी आम्ही सभापतींच्या निदर्शनास आणून देणार आहोत.'

युरी म्हणाले की, लोकांनाही आज सर्व विरोधक एकत्र आलेले हवे आहेत. विरोधी आमदारांमध्ये मतभिन्नता असू शकते. परंतु ती तात्पुरती बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सर्व विरोधी आमदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी संयुक्त रणनीतीही ठरवावी लागेल. लवकरच बैठकीत ती ठरवली जाईल.'

Web Title: All opposition parties will surround the government in monsoon session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा