पणजीत मांडवी नदीत भरकटलेल्या फेरीबोटीतून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 12:59 PM2017-10-27T12:59:04+5:302017-10-27T13:00:38+5:30
बेती-पणजी जलमार्गावरील भरकटलेल्या फेरीबोटीतून अखेर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भरकटलेली फेरीबोट अजूनही आहे त्याच ठिकाणी रुतून पडलेली आहे.
पणजी- बेती-पणजी जलमार्गावरील भरकटलेल्या फेरीबोटीतून अखेर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भरकटलेली फेरीबोट अजूनही आहे त्याच ठिकाणी रुतून पडलेली आहे. या जलमार्गावर शुक्रवारी नवी फेरीबोट सुरु करुन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात आली.
पणजीहून बेतीला जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेली फेरीबोट जोरदार वाऱ्यामुळे भरकटून फेरीधक्क्यापासून ६0 मीटर अंतरावर कांपालच्या दिशेने नदीत रुतली. गुरुवारी दुपारी ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व ३७ प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. यात ३७ प्रवाशी होते व १२ दुचाकीधारकांचा समावेश होता.
जलद कृती दलाचा अभाव
गुरुवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेने एक गोष्ट उघड झाली आहे. नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. जलद कृती दलाचाही अभाव आहे. जलद कृती करणारे असे दल असते तर गुरुवारची दुर्घटना टळली असती, असं मत व्यक्त केलं जात आहे. फेरीबोटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते परंतु त्यांच्यासाठी लाइफ जॅकेटची मात्र सोय नसते. पर्यटकांना जलसफरी घडवून आणणाऱ्या पणजीतील बोटींचीही हीच स्थिती आहे.
फेरीबोट रुतल्यानंतर पहिल्या प्रथम दुर्घटनास्थळी कोण पोचले असेल तर ते अग्निशामक दलाचे जवान होत. नदी परिवहन खात्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने अधिकारी सुस्त होते. दुपारी ४.४५ च्या सुमारास कॉल आला आणि काही मिनिटातच अग्निशामक बंब दाखल झाला.
पाच वर्षात ६ घटना
गेल्या पाच वर्षात मांडवी नदीत फेरीबोट तसेच अन्य बोटी भरकटण्याच्या अशा सहा घटना घडल्या. खराब हवामान हे एक कारण आहेच, पण त्याचबरोबर योग्य प्रशिक्षण, नियम, अंमलबजावणीचा अभाव हीसुद्धा इतर कारणं आहेत.
१२ मे २0१२ रोजी मांडवीत एका बोटीवरील खलाशी बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. बोटीवरुन नदीत फेकला गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
२३ ऑगस्ट २0१३ रोजी एम.व्ही विशाल रीया या बोटीने भरकटत जाऊन मांडवी पुलाच्या ७ नंबरच्या आणि १३ नंबरच्या खांबाला धडक दिली. जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकट जाऊन ही दुर्घटना घडल्याचे त्यावेळी चौकशीत आढळून आले. खात्याने बोटीचा मास्टर व इंजिन ड्रायव्हरला दोषी ठरवून त्याचा परवाना ४५ दिवसांकरिता त्यावेळी निलंबित केला होता.
१३ जानेवारी २0१७ रोजी एम व्ही विशाल इशान ही बोट भरकटून तिसऱ्या मांडवी पुलाच्या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी धडकली. या प्रकरणातही मास्टर व इंजिन ड्रायव्हरचे परवाने अनुक्रमे १५ व ७ दिवसांकरिता निलंबित केले होते. गेल्या फेब्रुवारीत पर्यटकांना जलसफर घडवून आणणारी सांतामोनिका बोट भरकटली व कांपाल येथे रुतली. २१४ पर्यटक त्यावेळी बोटीत होते त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. ओहोटीमुळे तसेच जोरदार वाऱ्यामुळे ती भरकटून रुतली होती. गेल्या ३0 मे रोजी एमव्ही विशाल धनंजय ही बोटही मिरामार किनाऱ्यावर रुतली. समुद्रातील वाळूच्या पट्ट्यात ही बोट रुतली.
अगदी अलीकडच्या घटनेत १६ जुलै रोजी मुरगांव बंदरातून मांडवी नदीत आणले जात असताना एम व्ही लकी सेव्हन हे कसिनो जहाज मिरामार किनाऱ्यावर रुतले. तब्बल ७0 दिवस हे जहाज त्या ठिकाणी रुतून बसले होते.