गोव्यातील सर्व रस्ते चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त करू- पाऊसकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 05:24 PM2019-07-30T17:24:47+5:302019-07-30T17:26:14+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांचं आश्वासन
पणजी : राज्यातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत ही गोष्ट खरी आहे. सरकार त्याविरुद्ध येत्या गणेश चतुर्थीपूर्वी उपाययोजना करील. राज्यभरातील सगळे रस्ते खड्डेमुक्त करून त्यात सुधारणा केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिपक प्रभू पाऊसकर यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.
सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस व अन्य आमदारांनी राज्यातील खराब रस्त्यांविषयी पाऊसकर यांना अनेक प्रश्न विचारले. तसेच रस्त्यांच्या बाजूची झुडपे कापणे व गटारे स्वच्छ करण्याचे काम हे चतुर्थीपूर्वी व्हायला हवे असेही फर्नाडिस म्हणाले. उत्तरादाखल बोलताना मंत्री पाऊसकर म्हणाले, की यावेळी गोव्यात डांबराचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे ३० टक्के रस्त्यांवर हॉटमिक्स कार्पेट घालता आले नाही. त्यामुळेही रस्त्यांवर सध्या खड्डे दिसून येतात. हे खड्डे बुजवले जातीलच. चतुर्थीवेळी लोकांना चांगले रस्ते मिळतील. हॉटमिक्स कार्पेट घातल्यानंतरही जर रस्त्यांवर खड्डे पडले तर तीन ते पाच वर्षे त्या रस्त्यांची देखरेखही संबंधित कंत्राटदारांनाच करावी लागेल. खड्डे पडल्यास कंत्रटदारांना ते स्वखर्चाने बुजवावे लागतील. कंत्रटदारांनी जर खड्डे बुजवले नाहीत तर सरकारकडे कंत्रटदारांची जी रक्कम असते, त्या रक्कमेमधून आम्ही ते काम करून घेऊ. तसेच अशा कंत्रटदारांना मग पुन्हा बांधकाम खात्याकडून काही काम दिले जाणार नाही.
बांधकाम खात्यात आपत्कालीन काम विभाग सुरू केला जावा, अशी सूचना कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली. अशा विभागाला विशेष अधिकार दिले जावेत. काहीवेळा तातडीने कामे करायची असतात. हा विभाग विशेष अधिकार वापरून काम करून घेऊ शकेल, असे रेजिनाल्ड म्हणाले. काही वर्षापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम खात्याने यंत्र खरेदी केले होते, त्या यंत्राचे काय झाले अशी विचारणा काँग्रेसचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी केली. ते यंत्र सध्या चालत नाही, आम्ही नवे यंत्र लवकरच खरेदी करू व त्या यंत्राद्वारे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेऊ, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.