विविध योजनांमुळे गोमंतकीयांचा चौफेर विकास: विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 09:42 AM2023-06-25T09:42:47+5:302023-06-25T09:43:34+5:30
राज्यातील महिलांना सरकारने मोठे व्यासपीठ निर्माण करू दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क होंडा : केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याच्या विकासासाठी झटत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास करण्यात येत आहे.
राज्यातील महिलांना सरकारने मोठे व्यासपीठ निर्माण करू दिले आहे. येणारा काळ सोनेरी असेल, त्यासाठी भाजपलाच साथ देण्याचे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. वाळपई येथे भाजपच्या लाभार्थी संमेलनात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार दिव्या राणे, नगराध्यक्षा शेहझीन शेख, वाळपई भाजप मंडळ अध्यक्ष रामनाथ डांगी, विनोद शिंदे, नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर, प्रसाद खाडीलकर, नगरगाव जि.प.सदस्या राजश्री काळे, नगरसेवक प्रसन्ना गावस, वसुउद्दीन सय्यद, शराफत खान, अनिल काटकर, उसगावचे उमाकांत गावडे, गुलेली सरपंच नितेश गावडे, सावर्डे सरपंच उज्ज्वला गावकर, खोतोडा सरपंच नामदेव राणे आदींची उपस्थिती होती.
तानावडे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी नऊ वर्षांत जनतेला भरभरून दिले आहे. विकासाभिमुख काम भाजपने केले आहे. सर्व योजना पैसे लोकांच्या बँक खात्यात पोहोचविले आहेत. त्यामुळे एजंटगिरी संपविली आहे. मोफत धान्य, मोफत शौचालय आदी सुविधा पोहोचविल्या आहेत. केंद्राच्या मदतीने गोव्यात आरोग्य क्षेत्रात सुधारणा झाल्या आहेत.
यावेळी रामनाथ डांगी यांनी विचार मांडले. नगराध्यक्षा शेयझीन शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वाळपई मतदारसंघातील अटल आश्रय योजनेंतर्गत घर दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेल्या सुमारे २५ लाभार्थीना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.