शैक्षणिक संस्थांना सर्वतोपरी सहकार्य: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 01:20 PM2024-07-05T13:20:39+5:302024-07-05T13:21:28+5:30
हरमल येथे नर्सिंग कॉलेजचे भूमिपूजन; विद्यार्थ्यांना शंभर टक्के रोजगार संधी
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल: गोव्यात शैक्षणिक क्षेत्रात सरकार उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सरकारमध्ये असताना अनेक योजना राबवल्या. त्यांच्या दूरगामी विचाराने हरमल पंचक्रोशी संस्थेचा उत्कर्ष होत आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी तत्पर असून, संस्थांना आपले सर्वतोपरी सहकार्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
या भूमिपूजन सोहळ्यास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर, माजी आमदार दयानंद सोपटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुभाष वेलिंगकर, संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत नाईक, सचिव सुधीर नाईक, संस्थेचे सल्लागार सुदन बर्वे, सदस्य तथा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर, कॉलेजचे प्राचार्य डॉ. पांडुरंग पंडित, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शांभवी नाईक-पार्सेकर, प्रा. गोविंदराज देसाई, प्रशासक प्रा. उदेश नाटेकर, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य किरुबा उपस्थित होते.
हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे नात्याने बोलत होते. अलीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आमूलाग्र परिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक नवीन धोरणाची अंमलबजावणी व प्रोत्साहन सुरू आहे. शिक्षणानंतर बेरोजगार असणे शक्य नाही. त्यासाठी धोरणात बदल अपेक्षित आहे. अलीकडे पॅकेज पद्धती असल्याने जास्त पॅकेज असल्यास संस्थेचे यश गृहीत होते. पार्सेकर यांनी कौशल्य रोजगार प्रशिक्षणार्थी निर्माण केली आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच नर्सिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के रोजगार संधी, पॅकेज निश्चित उपलब्ध होईल, परिचारिकांना इस्पितळात संधी आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार
व केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल श्रीपाद नाईक यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन चेअरमन पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यांना दशरथ नाईक, मकरंद परब, साईश कामत व जिग्नेश पेडणेकर यांनी साथसंगत केली. केंद्रीय मंत्री नाईक यांच्या मानपत्राचे मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर यांनी वाचन केले. विद्यार्थिनी शहनाझ सिद्दीकी, आर्या गावकर, साईशा कोरगावकर, सिद्धी तिळवे आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागत प्राचार्य किरुवा यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. दीपक किंजवडेकर, तर अध्यापिका शमिका नर्से यांनी आभार मानले.
संस्थेचा सदस्य असल्याचा अभिमान
एखाद्या संस्थेचे सदस्यपद स्वीकारणे भाग असते. मात्र, उच्चस्थानी असलेल्या संस्थेचे सदस्यपद हे अभिमानास्पद असते. सुदैवाने आपण हरमल पंचक्रोशी संस्थेचा आजीव सदस्य आहे, ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. सदस्य तथा राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळताना ह्या संस्थेचा उत्कर्ष व्हावा, यासाठी आपले कार्य सुरूच राहील, असे मुख्यमंत्री तथा पंचक्रोशी संस्थेचे सदस्य डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
संस्थेची नवी इमारत लवकरच होणार पूर्ण
हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन गणपत पार्सेकर यांची आठवण येते व त्यांचे ज्ञानदानाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे दिसून येते. विद्यमान चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या परिश्रमांमुळे स्वप्नवत कार्य चालविले आहे. निश्चितच ह्या गावात व राज्यात ही संस्था उल्लेखनीय कामगिरी करीत राहील. आपण ह्या संस्थेचा सदस्य असल्याचा अभिमान आहे व संस्थेची चौथी इमारत लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
म्हणून मुख्यमंत्र्यांना संस्थेचे सदस्यपद
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे आपल्या शैक्षणिक संस्थेचे सदस्य होते. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या आग्रहानुसार डॉ. प्रमोद सावंत यांना संस्थेचे सदस्यपद देण्यास आपल्यासह इतरांनाही आनंद होत असल्याचे टाळ्यांच्या आवाजावरून स्पष्ट होते. यंदाचा नवीन संकल्प म्हणजे, सदर इमारत चार मजली असून सुमारे ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील वर्षी ह्या तारखेस दोन्ही मान्यवरांच्या हस्ते, उद्घाटन होण्याची अपेक्षा व्यक्त्त करतो, असे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी विद्या संकुलातील, हायस्कूलच्या इमारतीस खासदार निधीतून पंचवीस लाख दिले होते. त्यानंतर पंचक्रोशी संस्थेने अल्पावधीत तीन इमारती उभारल्या. त्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी केले होते व अल्पावधीत इमारत पूर्ण झाली. त्यानंतर शैक्षणिक भरारी मारता आली, आता नर्सिंग कॉलेजचे भूमिपूजन मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत होत असल्याने ही इमारतसुद्धा लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास पार्सेकर यांनी व्यक्त केला.