गोव्यात नागरी पुरवठा खात्याची सर्व गोदामे आता सीसीटीव्ही कॅमेराचा निगराणीखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 01:20 PM2018-02-11T13:20:17+5:302018-02-11T13:20:35+5:30
नागरी पुरवठा खात्याच्या कुठ्ठाळी येथील मुख्य गोदामासह अन्य चार गोदामांच्या डागडुजीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पणजी : नागरी पुरवठा खात्याच्या कुठ्ठाळी येथील मुख्य गोदामासह अन्य चार गोदामांच्या डागडुजीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व अकराही गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी लोकमतला ही माहिती दिली. कुठ्ठाळीतील गोदामाच्या नूतनीकरणावर १ कोटी रुपये तर फोंडा येथील गोदामाच्या डागडुजीवर ३२ लाख रुपये खर्च केले जातील. डिचोली तसेच अन्य एका ठिकाणी असलेले गोदामाचेही नूतनीकरण केले जाईल.
या चार गोदामांना डागडुजीनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. धान्य चोरी तसेच अन्य गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. नागरी पुरवठा खात्याच्या सर्व गोदामांची दैनावस्था झालेली आहे. गोदामात माल पडून राहण्यामागे स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याची उचल न होणे हेही एक कारण आहे. लोकांच्या गरजेनुसार धान्य मागविले जाते मात्र लोक रेशनवर उचलच करीत नाहीत.
आधार जोडणीकडे ३५ टक्के रेशनकार्डधारकांची पाठ
दरम्यान, रेशन कार्डांना आधार कार्ड जोडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत होती. सुमारे ३ लाख ३0 हजार अर्ज वितरित करण्यात आले त्यापैकी ६५ टक्के रेशन कार्डधारकांनी आधार जोडणीसाठी अर्ज भरुन दिलेले आहेत. अन्य ३५ टक्के रेशन कार्डधारकांनी पाठ फिरवली. आधार जोडणीची प्रक्रिया मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
रेशन कार्डधारकांना त्यांची स्वस्त धान्याची सबसिडी यापुढे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा पर्याय आहे. रेशनवर स्वस्त दरातील धान्य स्वीकारणार की बँक खात्यात सबसिडी जमा करायची याबाबतचा निर्णय रेशन कार्डधारकांनी घ्यावयाचा असून तसे खात्याला अर्ज सादर करुन कळवायचे आहे. शिधापत्रिकाधारकांना धान्यावर सवलत देण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीटीएफ)अर्थात जी काही सवलत आहे त्याची रक्कम थेट खात्यात जमा करण्याची ही नवी योजना आहे.
अलीकडेच या अकरा गोदामांमधील सुमारे ७0७ मेट्रिक टन गहू वेळीच कीटकनाशकांची फवारणी न झाल्याने कीड लागून खराब झाला. जुना आणि खराब माल नवीन गव्हामध्ये मिसळून तो सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे लोकांना वितरित केला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर असे प्रकारही उघडकीस येतील.
राज्यात दारिद्र्य रेषेवरील १ लाख ९0 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. प्रती रेशन कार्ड ७ किलो गहू ९ रुपये १0 पैसे दराने तसेच ८ किलो तांदुळ प्रती किलो ११ रुपये ६0 पैसे दराने दरमहा दिले जातात. नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमधून दर महिन्याला साधारणपणे २ तारीखपासून त्या महिन्याचा कोटा उचलण्यास सुरवात होते व वाहतूकदार रेशन दुकानांना धान्य पुरवित असतात. गोव्याला धान्य पुरवठा पंजाबहून होतो. वास्को रेल्वे यार्डात हा माल आल्यानंतर हा माल आधी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात आणि नंतर नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमध्ये पाठवला जातो. मिळालेल्या माहितीनुसार रेशनवर वितरणासाठी दर महिन्याला सुमारे ३६४0 मेट्रिक टन तांदुळ तर १३१३ मेट्रिक टन गहू लागतो. भटिंडा पंजाबहून सोलापूरमार्गे रेल्वे वाघिणीतून गहू तर लुधियानामधून तांदूळ येतो.