झोनिंग प्लानवरून आरोप-प्रत्यारोप; मी खुश, सरकारला पाठिंबाः जीत आरोलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:48 PM2023-10-14T14:48:40+5:302023-10-14T14:48:55+5:30
विविध सरपंच, पंच सदस्यांनी मानले मंत्र्यांचे आभार
लोकमत न्यूज नेटवर्क हरमलः पेडणे तालुका नागरिक समितीच्या जागृत नागरिकांनी झोनिंग प्लान धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर लोकलढा उभारला. अवघ्या काही दिवसातच निर्णय लागला याबद्दल सरकारचे आभार असे उद्गार आमदार जीत आरोलकर यांनी काढले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांना आमचे सदैव सहकार्य असेलही ते म्हणाले. पेडणे बचाव अभियानच्या हरमल येथील सभेत ते बोलत होते. मांद्रेतील भगवती मंदिरात श्रीफळ व नंतर मिरवणुकीने आमदार जित आरोलकर हरमल येथे आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 'सरकारमधून बाहेर पडण्याचे शब्द माझ्या तोंडात आले. मात्र जनतेच्या पाठीशी राहण्याचे माझे कर्तव्य होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पेडणे तालुक्याला दोनशे कोटीचे पॅकेज दिले आहे. वीज सबस्टेशन कार्यान्वित होईल. पाणी समस्या सोडविण्यासाठी ३० एमएलडी प्रकल्प पूर्णतेकडे जात आहे. झोनिंग प्लानबाबत जनतेचा निर्णय महत्वाचा आहे.
मांद्रेतील आंदोलन यशस्वी होण्यासाठी जनतेची साथ महत्वाची होती. या आंदोलनासाठी हरमल पंचायत मंडळ सक्रिय सहभागी झाले, याबद्दल त्यांचे खास आभार, असे आमदार जित आरोलकर यांनी व्यक्त केले. सरपंच अॅड. अमित सावंत, माजी सरपंच इनसियो डिसोझा, पंच प्रशांत नाईक, उपसरपंच तारा हडफडकर, देश सावंत, आगरवाडाचे पंच हेमंत चोपडेकर यांची भाषणे झाली. दयानंद मांद्रेकर यांनी प्रास्ताविक भाषण केले.
व्यासपीठावर हरमलचे सरपंच बर्नार्ड फर्नांडिस, केरीच्या सरपंच धरती नागोजी, तुयेचे सरपंच सुलक्षणा नाईक, पंच अजय गाड आदींसह मांद्रे मगो गटाध्यक्ष प्रवीण वायंगणकर उपस्थित होते. पालयेचे पंच सागर तिळवे यांनी आभार मानले.
आमदार, मंत्र्यांकडून लोकभावनेची कदर : पेडणे भाजप मंडळ
नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आमदार प्रवीण आर्लेकर यांनी लोकभावानेची कदर करून तालुक्याचा झोनिंग प्लान रद्द केल्याबद्दल पेडणे भाजप मंडळाने त्यांचे आभार मानले. पेडणे भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत तांबोसे मोपा उगवेचे सरपंच तथा पेडणे भाजप मंडळाचे सरचिटणीस सुबोध महाले म्हणाले की, झोनिंग प्लान रद्द करण्याचा निर्णय लोकहिताचा आहे. आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे चर्चा केली होती. पेडणेच्या नगरसेविका तथा भाजप सरचिटणीस उषा नागवेकर, इब्रामपूरचे सरपंच अशोक धावस्कर, उपसरपंच विजय मोपकर, पंच सिया धुरी, वृषाली नाईक उपस्थित होते.
आरोलकर, भाजपमुळे मांद्रेत जमिनींचा सौदा
मांद्रे मतदारसंघातील आमदार जीत आरोलकर, तेथील पंचायत प्रतिनिधी, नगर नियोजन मंत्री व मुख्यमंत्री हे सगळे मिळून गोमंतकीयांची फसवणूक करीत आहेत असा आरोप रिव्होल्यूशनरी गोवन्सचे नेते मनोज परब यांनी केला. राज्यातील डोंगर, पर्यावरण आणि त्या डोंगरावरील राखणदारांवर हात घातला जात असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परब म्हणाले, मांद्रे, हरमल, चोपडे, मोरी या किनारपट्टी भागातील गावात परप्रांतीयांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. तेथील पंचायत, स्थानिक आमदार तसेच सरकारमधील मंत्री मिळून यात घोळ करीत आहेत. झोनिंग प्लानच्या माध्यमातून राजकारण सुरू आहे. मांद्रेसारख्या
गावात रोज तेथील महिला, मुली घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण करतात. पाण्यासाठी लोक तहानलेले आहेत. मग त्या मतदारसंघात गावांचा नाश करणारे, जंगले तोडून मेगा प्रकल्प उभे राहतात, हे सारे कसे घडते असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला.
मांद्रे नष्ट करण्यासाठी झोनिंग प्लानची गरज नाही, तर आश्वे गावात डोंगराळ भागात उभारलेला मेगा प्रकल्पानेही लोकांचे, पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. मतदारसंघातील नऊ पंचायतींना ६ युनिटच्या वरील प्रकल्पांना परवानगी देण्यात येऊ नये, असा निर्देश द्यावा. तसे पत्र टीसीपी, पीडब्ल्यूडी खात्यालाही द्यावे. मेगा प्रकल्पांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
झोनिंग प्लान नेत्यांच्या इशाऱ्यावरूनच : वाल्मिकी नायक
पेडणे तालुका जमीन रूपांतर आराखडा आणि त्याच्या अलीकडील घडामोडींबद्दल आम आदमी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचा गोव्याच्या जमिनीवर डोळा असून, पेडणे तालुका जमीन रूपांतर आराखडा त्यांच्या निर्देशानुसारच तयार करण्यात आल्याचा आरोप आपचे उत्तर गोवा कार्याध्यक्ष वाल्मिकी नायक यांनी केला.