मराठी, कोंकणीबरोबर संस्कृतही टिकली पाहिजे: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 09:43 AM2024-03-06T09:43:27+5:302024-03-06T09:45:02+5:30
राजभाषा संचालनालयाच्या पुरस्कारांचे वितरण, नव्या शैक्षणिक वर्षांपासून शाळांमध्ये संस्कृत शिक्षक.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोणत्याही भाषेचा योग्य प्रचार व प्रसार झाल्यास भाषा दीर्घकाळ टिकून राहते. राज्यात मराठी व कोंकणी या दोन भाषा आहेतच, पण, संस्कृत भाषा देखील बऱ्यापैकी वापरात असल्याचे पाहून समाधान वाटले. मराठी व कोंकणीसोबत संस्कृत भाषाही टीकून राहिली पाहीजे. यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये संस्कृत शिक्षक रुजू करून घेण्यात येतील. संस्कृतच्या प्रसार, प्रचाराचा हेतूने निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.
राजभाषा संचालनालयातर्फे संस्कृती भवनात आयोजित केलेल्या भाषा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहूणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजभाषा संचालक राजू गावस, उपसंचालक अनिल सावंत, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यात युवा साहित्यिक तयार होणे काळाची गरज आहे. कोंकणी भाषेला सरकार नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे. कर्मचारी भरती आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतही कोंकणींचा वापर झाला आहे. महत्वाचे म्हणजे ९०० पैकी केवळ १७ जण या परीक्षेत नापास झालेत. जेव्हा याची चौकशी केली तेव्हा समजले की, ते मूळ गोमंतकीय नव्हते. यापुढे नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये कोंकणीचा वापर करणार आहोत, कोकणी पोटापाण्याची भाषा व्हावी हाच यातून आमचा प्रयत्न आहे. असेही ते म्हणाले.
राजकीय आरक्षणाचाबत एसटी समुदायाने केंद्र आणि राज्य सरकारवर विश्वास ठेवावा, केंद्र सरकार निश्चित फेररचना आयोग नेमण्याची प्रक्रिया सुरु करेल, असे सावंत यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २०११- २०चा 'ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर कोंकणी भाषा पुरस्कार' साहित्यिक पुंडलीक नायक यांना, बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार इतिहासकार डॉ. उल्हास प्रभुदेसाई यांना, तर 'दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार' संस्कृतचे अभ्यासक लक्ष्मण पित्रे यांना प्रदान करण्यात आला.
तर २०२०-२०२१चा 'ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर कोंकणी भाषा पुरस्कार' बाल साहित्यासाठी परिचित असलेल्या मीना काकोडकर यांना, बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार' समीक्षक आणि संशोधक डॉ, सोमनाथ कोमरपंत यांना तर 'दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार' मनोहर आमशेकर यांना प्रदान केले वर्ष २०२१-२२चा 'ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर कोंकणी भाषा पुरस्कार लेखक अशोक भोसले यांना, 'बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार पत्रकार गुरुदास सावळ यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपदा कुंकळ्येकर लिखित "गीतार्थ- भगवदिगतेचो आपरोस आणि डॉ. हनुमंत चोपडेकर लिखित 'कोंकणी चळवळीचीं तीन पानां' या कोंकणी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.