आधीच पाणीटंचाई त्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिनी फुटली; नागरिकांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 06:53 PM2019-08-22T18:53:25+5:302019-08-22T18:53:43+5:30
सांताक्रुझ, सांतआंद्रेत आठ दिवस नळ कोरडे, पुन्हा जलवाहिनी फुटली, कंत्राटदाराची हलगर्जी
पणजी : तिसवाडी तालुक्यातील कालापुर येथे रस्त्याचे काम करताना कंत्रटदाराने प्रचंड बेपर्वाई केली. परिणामी रात्री तिथे जलवाहिनी फुटली. यामुळे सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघांतील बहुतेक गावांमधील सगळे नळ सलग आठव्या दिवशी कोरडपे पडले. कंत्राटदार व बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणाविषयी सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला.
खांडेपार येथे 9 मिमी व्यासाची जलवाहिनी सात दिवसांपूर्वी फुटल्यामुळे अगोदरच पूर्ण तिसवाडी तालुका पाण्यावीना होरपळला. राजधानी पणजीसह विविध भागांना सात दिवस पाण्यावीना रहावे लागले होते. खांडेपार येथे जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पणजीसाठी पाणी पुरवठा गुरुवारी सकाळी सुरू झाला. आल्तिनो येथील टाकीत रात्री नऊ वाजता पाणी पोहचले. आठ टाक्या भरेर्पयत सकाळचे सात उजाडले. त्यानंतर पाणी पुरवठा जरी सुरू झाला तरी, पणजीतील सर्व भागांना पाणी पोहचले नाही. सकाळी अकरा वाजेर्पयत तरी पणजीतील काही भागांतील नळ कोरडेच होते. आल्तिनो येथील घरांमधील नळांना सकाळी सात वाजल्यानंतर पाणी आले. पणजीतील ज्या भागांना पाणी मिळाले, ते पाणी गढूळ होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास नळाचे पाणी पुन्हा बंद झाले. तथापि, सात दिवसांनंतर पाणी आल्यामुळे पणजीतील लोकांमध्ये आनंद व्यक्त होत असतानाच कालापुर येथे जलवाहिनी फुटल्याचे वृत्त येऊन थडकले.
कालापुर जंक्शनच्या जरा पुढे जलवाहिनीची पर्वा न करताच महामार्गाचे काम करण्यात येत आहे. जलवाहिनी न हटविता, जलवाहिनीवरूनच रस्त्याचे काम केले जाते. तिथे जलवाहिनी फुटली. यामुळे आठव्या दिवशीही सांताक्रुझ व सांतआंद्रेमधील लोकांना पाणी मिळू शकले नाही. लोकांचे यामुळे खूपच हाल होत आहेत. लोक कंत्रटदाराविषयी व बांधकाम खात्याविषयीही तीव्र संताप व्यक्त करत आहेत. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस यांनी कालापुर येथे भेट दिली व संबंधित अधिका:यांना फैलावर घेतले.
सांतआंद्रे व सांताक्रुझमध्ये अनेक रेस्टॉरंट्स आहेत. त्यांची गैरसोय झाली आहे. शिवाय बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळातही पाण्यावीना शौचालये वगैरे तुंबली आहेत. सरकारचे त्याकडे लक्षच नाही. पाळे, शिरदोन, कुडका, बांबोळी, आल्त सांताक्रुझ आदी भागांतील लोकांना सलग आठ दिवस प्रथमच पाण्यावीना रहावे लागले आहे. लोक टँकर व पाण्याच्या बाटल्या शोधतात. सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्याशी काही लोकांनी संपर्क साधला व टँकर पाठवा अशी विनंती केली. मात्र ते सर्वासाठीच टँकरची सोय करू शकले नाही.
महामार्गाचे काम करताना संबंधित यंत्रणा काळजीच घेत नाही हे संतापजनक आहे. कोणत्याही स्थितीत लवकर जलवाहिनी दुरुस्त करा व सांताक्रुझ-सांतआंद्रेला पाणी पुरवा असे मी अधिका:यांना सांगितले आहे. अगोदरच आठ दिवस लोकांचे पाण्यावीना खूप हाल झाले आहेत. भोंगळ कारभार सुरू आहे. खूप राग येतोय. - टोनी फर्नाडिस, आमदार, सांताक्रुझ