अमेरिका रिर्टन्ड बनला सराईत चोरटा, गोव्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 09:03 PM2023-06-23T21:03:10+5:302023-06-23T21:03:31+5:30
मडगाव : पूर्वी अमेरिकेत काम करणाऱ्या आणि नंतर मायदेशात परतल्यावर वृद्ध महिलांना हेरुन त्यांच्या अंगावरील सोनसाखळी हिसकावणाऱ्या एक सराईत चोरट्याला गोव्यात अटक करण्यात आली आहे. उमेश ...
मडगाव : पूर्वी अमेरिकेत काम करणाऱ्या आणि नंतर मायदेशात परतल्यावर वृद्ध महिलांना हेरुन त्यांच्या अंगावरील सोनसाखळी हिसकावणाऱ्या एक सराईत चोरट्याला गोव्यात अटक करण्यात आली आहे. उमेश चव्हाण (३९) असे या संशयिताचे नाव असून, तो मूळ महाराष्ट्रातील सावंतवाडी येथील आहे. तो सध्या येथील नावेली भागात रहात होता. २८ मे रोजी सेकरावाडा चिंचणी येथील फिलिपिना पियेदाद फर्नांडीस (७१) ही वृद्द महिला आपल्या घरी जात असताना, दुचाकीवरुन आलेल्या एका अज्ञाताने तिच्या अंगावरील ५० हजार रुपये किमंतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. कुंकळ्ळी पोलिसांनी भादंसंच्या ३५६ व ३७९ कलमाखाली हे प्रकरण नोंदवून घेतले होते.
दक्षिण गोवापोलिस अधिक्षक अभिषेक धनिया यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव विभागाचे उपअधिक्षक संतोष देसाई, कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण उपनिरीक्षक भरत खरात , कविता रावत , नारायण पाडकर व अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना संशयित उमेशला गुढी येथे जेरबंद केले.
संशयित अमेरीकेतून आल्यानंतर बेकार होता. पदरचे पैसेही त्यांनी संपविले होते. नंतर तो चाेरी करायला लागला. तो वृद्द महिलांना लक्ष्य बनवित होता. सकाळी प्रार्थनेला जाउन घरी परत येणाऱ्या वृध्द महि्लांना हेरुन तो त्यांच्या सोनसाखळ्या पळवित होता. चोरलेल्या सोनसाखळया तो वित्त शाखेत तारणहार म्हणून ठेवून तेथून गोल्ड लॉन घेत होता.
वेर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही त्यांनी अशीच एक चोरी केली होती. यापुर्वी मडगाव, कुंकळ्ळी, वेर्णा व कोकण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतही त्यांनी चोऱ्या केल्या आहेत. उत्तर गोव्यातही त्याने चोऱ्या केल्या आहेत का याचा सदया पोलिस शोध घेत आहेत. त्याला अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.