अमित शाह-विश्वजीत राणे यांची भेट अन् मंत्रिमंडळ फेररचनेस ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2024 12:48 PM2024-09-15T12:48:55+5:302024-09-15T12:49:45+5:30
गोव्यासह सिंधुदुर्गमधील राजकारणासह अन्य विषयांवर चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य मंत्रिमंडळातून दोघा- तिघा मंत्र्यांना वगळणे, विविध मंत्र्यांची खाती बदलणे किंवा एकूणच मंत्रिमंडळाची पूर्ण फेररचना करणे, अशा विषयांना आता दिल्लीतूनच ब्रेक लावला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. काल दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची मंत्री विश्वजीत राणे यांनी भेट घेतली व त्यावेळीही गोव्यासह सिंधुदुर्गमधील विषयांबाबतही चर्चा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मंत्री राणे यांनी कोणतीच माहिती उघड केली नाही, पण आपली शाह यांच्यासोबत भेट झाली एवढेच त्यांनी सांगितले. शुक्रवारी राणे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना दिल्लीत भेटले होते. काल अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली व गोव्यातील राजकीय स्थितीविषयी माहिती दिली. तसेच, गोव्यात विरोधी पक्षाचे काय चाललेय, भाजपचे संघटनात्मक काम कसे चाललेय, याविषयी शाह यांनी राणे यांच्याकडून माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोव्यात निर्माण झालेल्या काही वादांविषयीही शाह यांनी माहिती जाणून घेतली. विश्वजीत राणे हे पूर्वीपासून अमित शाह व बी. एल. संतोष यांच्या संपर्कात आहेत, याची कल्पना भाजपच्या गोव्यातील सर्व नेत्यांना आहे. कधी कर्नाटक, कधी इंदोर, तर कधी हिमाचल प्रदेश अशा भागांत निवडणुकीची जबाबदारी राणे यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडूनच दिली जाते. यावेळी सिंधुदुर्गातील आठ मतदारसंघांची जबाबदारी दिली गेली आहे. त्याविषयी राणे यांनी शाह यांना अहवाल दिला. गोव्यात विश्वजित राणे यांचे टीसीपी खाते काढले जाईल, अशी चर्चा अधूनमधून होत असते. पण, त्या चर्चेत काही तथ्य नाही, असे भाजपच्या काही बड्या नेत्यांनी राणे यांना सांगितल्याचे कळते.