अमित शाहांना विश्वजीत राणे भेटले; सत्तरीत सभेसाठी निमंत्रण, पेडणेच्या झोनिंग प्लानप्रश्नीही चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:21 PM2023-10-11T14:21:34+5:302023-10-11T14:23:09+5:30
पेडणे येथील झोनिंग प्लेनच्या विषयाबाबतही विश्वजीत यांनी शहा यांना माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : झोनिंग प्लानचा विषय गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे टीसीपी मंत्री विश्वजीत राणे यांनी काल, मंगळवारी दिल्ली गाठली. तसेच दिल्लीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सत्तरी तालुक्यात पुढील दोन महिन्यांनंतर एक जाहीर सभा घ्यायची, असे राणे यांनी ठरवले असून त्या सभेसाठी त्यांनी शहा यांना निमंत्रित केले आहे.
मध्य प्रदेशसह अन्य चार राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकांच्या निकालानंतर गोव्यात एक सभा घेतली जाईल. सत्तरीत ही सभा घेण्याचा विश्वजीत यांचा इरादा आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी शहा यांना निमंत्रण दिले आहे. पेडणे येथील झोनिंग प्लेनच्या विषयाबाबतही विश्वजीत यांनी शहा यांना माहिती दिली.
झोनिंग प्लान मसुदा स्थगित ठेवण्यापूर्वीही विश्वजीत यांनी भाजपच्या केंद्रातील काही नेत्यांशी चर्चा केली होती. लोकांना जर नको असेल तर आपण झोनिंग प्लान मसुदा प्रक्रिया पुढे नेणार नाही, असे यांनी शहा विश्वजीत यांनी यांना सांगितल्याची माहिती मिळाली. लोकांना विश्वासात घेतले जाईल, असेही राणे यांनी सांगितले. अर्थात देशातील लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत कोणताच संवेदनशील विषय चिघळून द्यायचा नाही हे केंद्राचे धोरण आहे, याची कल्पना विश्वजीत यांना आली आहे.
तानावडे, रोहन, शेट्येही दिल्लीस
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनीही काल दिल्ली गाठली. तानावडे हे संसदेच्या कॉमर्स कमिटीच्या बैठकीत भाग घेतील. त्यानंतर ते आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचीही भेट घेणार आहेत. तानावडे यांच्यासोबत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हेही दिल्लीत आहेत. तेही चंद्रशेखर यांना भेटणार आहेत. गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे हेही आज दिल्लीत दाखल होणार आहेत. ते गुरुवारी काही केंद्रीय नेत्यांना भेटणार आहेत. गोव्यातील राजकीय स्थितीवरही चर्चा होईल.