अमित शाह यांच्या दौऱ्यात मंत्र्यांसह फुटिरांची 'कसोटी'; मतदारसंघांचे दौरे, सभा फोंड्यातच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:19 AM2023-04-11T08:19:59+5:302023-04-11T08:20:54+5:30

भाजप कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात शाह यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभावी याबाबत चर्चा करण्यात आली.

amit shah visit to test of splits with ministers constituency tours meetings in phonda itself | अमित शाह यांच्या दौऱ्यात मंत्र्यांसह फुटिरांची 'कसोटी'; मतदारसंघांचे दौरे, सभा फोंड्यातच

अमित शाह यांच्या दौऱ्यात मंत्र्यांसह फुटिरांची 'कसोटी'; मतदारसंघांचे दौरे, सभा फोंड्यातच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची येत्या रविवारी (दि. १६) होणार असलेली जाहीर सभा काँग्रेस फुटीर आठ आमदार तसेच मंत्रिमंडळातील तीन ते चार मंत्र्यांसाठी कसोटीची ठरणार आहे.

काल भाजप कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात शाह यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभावी याबाबत चर्चा करण्यात आली. किमान २५ हजार लोकांची उपस्थिती लाभावी यासाठी प्रयत्न चालले आहे. आठ काँग्रेस आमदार जे वरून) गेल्या सप्टेंबरमध्ये भाजपमध्ये आले त्यांच्यावरही या सभेसाठी माणसे आणण्याची जबाबदारी आहे. दक्षिण गोव्यातून दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर तसेच उत्तर गोव्यातून मायकल लोबो, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, डिलायला लोबो व केदार नाईक यांना शहा यांच्या सभेला माणसे आणून आपली ताकद दाखवावी लागेल.

दुसरीकडे सावंत मंत्रिमंडळातील तीन ते चार मंत्री पक्षासाठी अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत, अशा तक्रारी याआधीच केंद्रीय नेतृत्वाकडे पोहोचलेल्या आहेत, त्यांनाही आपली ताकद दाखवावी लागेल. शाह यांच्या सभेसाठी कोणी किती माणसे आणली याबाबत स्थानिक नेतृत्वाचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीला सभापती रमेश तवडकर हे गोव्याबाहेर असल्याने उपस्थित नव्हते. बाबू कवळेकर तसेच गोविंद पर्वतकर हेही उपस्थित राहू शकले नाहीत.

द. गोव्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना देणार कानमंत्र 

गोवा भेटीत शाह दक्षिण गोव्यातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी, आमदार, मंत्र्यांशी चर्चा करतील आणि त्यांना लोकसभेची जागा जिंकण्यासाठी कानमंत्रही देतील. लोकसभा उमेदवारीबाबत तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले की, उमेदवार निवडण्यासाठी पक्षात जी पद्धत प्रचलित आहे तीच वापरली जाईल. सर्वेक्षण वगैरे करून नंतरच उमेदवार निवडला जाईल.

२५ हजार उपस्थितीचे लक्ष्य

भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी शाह यांच्या या सभेला २५ हजार लोकांची उपस्थिती लाभावी, असे टार्गेट आम्ही ठेवले आहे. ते म्हणाले की, दिवस कमी असल्याने आज मंगळवारपासून तालुकावार पक्ष कार्यकत्यांच्या बैठका घेतल्या जातील. शाह यांची ही सभा आम्हाला यशस्वी करायची आहे.

नवीन चेहरा देणार काय?

या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे उत्तम प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. म्हादईचा विषय तापलेला असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपसाठी स्टार प्रचारक म्हणून कर्नाटकात सभा घेत आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे उत्तर कन्नड भागात प्रचार करणार आहेत. हे योग्य आहे का, या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, हे दोन वेगवेगळे विषय आहेत. म्हादईच्या बाबतीत गोवा सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. म्हादई वाचवण्यासाठी आमची न्यायालयीन लढाई चालूच राहील. कर्नाटकात पत्रकारांनी गोव्याच्या भाजप नेत्यांना म्हादईसंबंधी प्रश्न केला तरी आमचे नेते म्हादईशी तडजोड नाहीच, असे ठामपणे सांगतील.

मतदारसंघांचे दौरे

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांत भाजपला पराभव पत्करावा लागला त्या मतदारसंघांचा दौरा शाह स्वतः करत आहेत. दक्षिण गोवा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अॅड. नरेंद्र सावईकर यांचा अवघ्याच मतांनी पराभव झाला होता.

सभा फोंड्यातच

तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांची सभा फोंडा तालुक्यातच घेण्याचे निश्चित झालेले आहे. १६ रोजी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील दौरा आटोपून ते दुपारनंतर गोव्यात येतील. फर्मागुडी येथील मैदान, शिरोडा बायपास मैदान अशा दोन तीन जागा विचाराधीन आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: amit shah visit to test of splits with ministers constituency tours meetings in phonda itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.