'पर्रीकरांच्या बेडरुममधील राफेल व्यवहाराच्या फाइल्स नेण्यासाठीच अमित शहा गोव्यात'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 06:32 PM2019-02-12T18:32:12+5:302019-02-12T18:52:00+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असलेल्या राफेल व्यवहाराच्या फाईल्स नेण्यासाठीच गोव्यात आले होते,असा खळबळजनक आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी केला आहे.
पणजी : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असलेल्या राफेल व्यवहाराच्या फाईल्स नेण्यासाठीच गोव्यात आले होते, असा खळबळजनक आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन देशप्रभू म्हणाले की, ‘पर्रीकर यांच्याकडे या फाइल्स असल्याने त्यांना आजवर मुख्यमंत्रिपदावर ठेवले आहे. उद्या जर त्यांना या पदावरुन हटविले तर त्यांच्या बेडरुममधील फाइल्स नेल्याचे स्पष्ट होईल.’ राफेल व्यवहाराची माहिती तत्कालीन संरक्षणमंत्री पर्रीकर यांनाही होती. त्यांनी भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही देशप्रभू यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचारात पर्रीकर यांचाही सहभाग आहे, असा आरोप त्यांनी केला.
‘गोवा के चौकीदार भी चोर है’, राफेल प्रकरणात ‘गोवा के चौकीदार भी चोर है’, असा आरोप त्यांनी प्रत्यक्ष नाव न घेता केला. ते म्हणाले की, या प्रकरणातील भ्रष्टाचार आता सर्वश्रुत आहे. ‘देश के चौकीदार चोर है,’ आणि त्याचबरोबर ‘गोवा के चौकीदार भी चोर है’.
अमित शहा यांच्या गोवा दौ-याच्या प्रयोजनाबाबत त्यानी संशय व्यक्त केला. पर्रीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन शहा यांनी तब्बल ४५ मिनिटे चर्चा केली. राफेल व्यवहारातील अडचणीत आणू शकणा-या फाइल्स पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचे खुद्द पर्रीकर मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानेच सांगितल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहे. या फाइल्स ताब्यात घेण्यासाठीच शहा आले होते, असे देशप्रभू म्हणाले.
१३ हजार कोटी रुपयांचा घपला करण्याचा मार्ग मोकळा करुन देणा-या या व्यवहाराची पर्रीकर यांनाही माहिती होती त्यांनी संरक्षणमंत्री असताना हे व्यवहार का रोखले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, शहा यांची सभा अचानक लावण्याचे कारण काय, असा सवाल करुन देशप्रभू म्हणाले की, ‘ शहा हे बोलायला उभे राहिले तेव्हा लोक निघून गेले. खाणींबाबत एक शब्दही शहा बोलले नाहीत.’