गोव्यात अमित शहा भेटीची जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2016 10:30 PM2016-08-16T22:30:53+5:302016-08-16T22:30:53+5:30
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येत्या शनिवारी गोवा भेटीवर दाखल होत आहेत. बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या संमेलनावेळी ते मार्गदर्शन करणार आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येत्या शनिवारी गोवा भेटीवर दाखल होत आहेत. बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या संमेलनावेळी ते मार्गदर्शन करणार आहेत. सुमारे साडेसहा ते सात हजार कार्यकर्त्यांची नावे या संमेलनासाठी आत्तापर्यंत भाजपच्या येथील कार्यालयात सादर झाली आहेत.
राज्यात एकूण 1 हजार 635 बूथ आहेत. प्रत्येक बूथ क्षेत्रतून सात ते दहा कार्यकत्र्याची नावे येत आहेत. एका मांद्रे मतदारसंघातून सुमारे 430 कार्यकर्त्यांची नावे आलेली आहेत. ज्या मतदारसंघातील बूथ क्षेत्रांमध्ये भाजपचे बळ कमी आहे तिथून सरासरी तीन ते पाच नावे येत आहेत. या सर्व कार्यकत्र्याना पक्षाकडून ओळखपत्रे दिली जाणार आहेत. ओळखपत्र असलेल्या कार्यकत्र्यालाच संमेलनामध्ये भाग घेता येईल. 20 रोजी सायंकाळी चार वाजता बांबोळी- दोनापावल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात हे संमेलन होईल. ते प्रसार माध्यमांसाठीही खुले आहे. बूथस्तरीय कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणी आणण्यासाठी पक्षातर्फे वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
अमित शहा हे 19 रोजी रात्री गोव्यात दाखल होणे अपेक्षित होते. तथापि, आता त्यांचा कार्यक्रम थोडा बदलला असून ते 20 रोजी दुपारी एक वाजता गोव्यात पोहचतील. त्यानंतर आल्तिनो येथील स्टेट गेस्ट हाऊसमध्ये ते जातील. तिथे मुख्यमंत्र्यांशी, मंत्र्यांशी व भाजपच्या कोअर टीमशी त्यांची बैठक होईल. त्यानंतर ते संमेलनाच्या ठिकाणी कार्यकत्र्याना मार्गदर्शन करणार आहेत. 20 रोजी रात्रीच ते दिल्लीला परततील. अमित शहा हे कधीच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत नाहीत, ते सरकारी विश्रामगृहात वगैरे राहणे पसंत करतात, असे पक्ष सुत्रांनी सांगितले. भाजपची सारी यंत्रणा सध्या संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.