शहा पणजी निवडणुकीवर देखरेख ठेवून, केव्हाही अपहरणे घडू शकतात- काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 09:53 PM2019-05-14T21:53:46+5:302019-05-14T21:53:59+5:30
अपहरणासारखे प्रकार घडू शकतात, असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे.
पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देखरेख ठेवून आहेत, त्यामुळे अपहरणासारखे प्रकार घडू शकतात, असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. बाबुश मोन्सेरात प्रकरणात पीडितेला संरक्षण देण्यास सरकार अपयशी ठरल्याचा तसेच मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील गृह खाते, पोलीस कूचकामी ठरल्याचा आरोप करण्यात आला. काँग्रेसी उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्याविरुद्ध बलात्काराचा खटला न्यायालयात चालू आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी वसतिगृहातून बेपत्ता झाल्याने आरोप-प्रत्यारोप चालू आहेत.
पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष काँग्रेस गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘पीडित मुलगी याआधी चार वेळा वसतिगृहातून बेपत्ता झाली होती व नंतर परतली होती. पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवणे तसेच तिला पुरेसे संरक्षण देणे आवश्यक होते, परंतु गृह खात्याला तशी गरज भासली नाही. आता निवडणूक पाच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना बाबुश यांना जास्तीत जास्त अडचणीत आणण्यासाठी विरोधक हे प्रकरण उकरून काढत आहेत. आमच्या उमेदवाराविरुद्ध हेतू पुरस्सर संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे.’ बाबुशविरुद्ध 10 गुन्हे नोंद असल्याचा अपप्रचार केला जात आहे, असे नमूद करून चोडणकर म्हणाले की, केवळ दोन गुन्हे त्यांच्याविरुद्ध आहेत.
काँग्रेसचे कायदा विभागाचे प्रमुख तथा माजी अॅडव्होकेट जनरल कार्लुस फेरैरा म्हणाले की, ‘ पीडीतेला संरक्षण देण्याचे सोडून ‘चौकीदार लपून बसला. वरील प्रकरणात न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेऊन ३ जून रोजी आदेश ठेवलेला आहे. बाबुश यांच्यावरील आरोप कायम ठेवायचे की वगळायचे याबाबत अजून निवाडा व्हायचाच आहे त्यामुळे संशयिताकडून पीडितेच्या बाबतीत असे काही घडण्याचा प्रश्नच नाही. बाबुश हे त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंबंधी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देत नाही म्हणून भाजपने आयोगापर्यंत तक्रारी केल्या. प्रत्यक्षात निवडणुकीआधी ४८ तास पार्श्वभूमी जाहीर करण्याची मुभा आहे. भाजपने याबाबतीत आपली राजकीय दिवाळखोरीच दाखवून दिली.’
किती काळ फसविणार?
कसिनोंच्या नावाने भाजप किती काळ पणजीवासीयांना फसविणार?, असा सवाल चोडणकर यांनी केला. कसिनोंचा विषय जुना आहे. २00२ ते २00५ या काळात भाजप सरकार सत्तेवर होते तेव्हा पर्रीकर मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी मांडवीतील कसिनो का काढले नाहीत, असाही प्रश्न त्यांनी केला. कसिनो कोणी आणले हा भाग वेगळा आहे. भाजपने कसिनोंना खतपाणी का घातले, असाही सवाल चोडणकर यांनी केला.
काँग्रेसी आमदार एकसंध
दरम्यान, काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा जो दावा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे करीत आहे तो विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. ते म्हणाले की, ‘ आमिषाने जे कोणी फुटायचे होते ते फुटले आता काँग्रेसमध्ये सर्वजण एकसंध आहेत. येथे कोणीही फुटत नाहीत म्हणून भाजपने सरकारात घटक पक्ष असलेल्या मगोपचे दोन आमदार मध्यरात्री फोडले.