इफ्फीच्या उद्घाटनास अमिताभ बच्चन, आशा भोसलेंना निमंत्रित करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 08:31 PM2019-10-14T20:31:37+5:302019-10-14T20:32:51+5:30
20 नोव्हेंबरपासून इफ्फीला प्रारंभ होणार
पणजी : पन्नासाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास (इफ्फी) येत्या दि. 20 नोव्हेंबरला आरंभ होणार आहे. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी यावेळी खास अमिताभ बच्चन व आशा भोसले यांना निमंत्रित करावे असे दिल्लीत चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या पातळीवर ठरले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
अमिताभ बच्चन यांच्या हस्ते इफ्फीचे उद्घाटन करावे व खास निमंत्रित म्हणून आशा भोसलेंना निमंत्रित करावे असा आयोजकांचा विचार आहे. इफ्फीच्या तयारीने पणजीत वेग घेतला आहे. शहरात रंगकाम सुरू झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इफ्फीशीनिगडीत कामांच्या तयारीचा सोमवारी आढावा घेतला. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांनी सगळी माहिती जाणून घेतली.
इफ्फी यशस्वी करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे सहकार्य व मदत गरजेची असते. मुख्यमंत्र्यांनी त्यानुसार खात्यांना सूचना केल्या आहेत. इफ्फीसाठी सध्या देश-विदेशातून साडेचार हजार प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. यावेळी दहा हजारांपर्यंत संख्या जाऊ शकते. फळदेसाई यांच्या मते इफ्फीची सगळी तयारी 15 नोव्हेंबर्पयत पूर्ण होईल. सगळ्या कामांच्या निविदांना येत्या 17 तारखेपर्यंत अंतिम रुप देऊन कंत्राटदार कंपन्या निश्चित केल्या जाणार आहेत. उद्घाटन व समारोप सोहळ्यासाठी इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी यापूर्वीच ठरलेली आहे. येत्या २० तारखेपर्यंत तयारीच्या स्थितीची सगळी माहिती गोवा मनोरंजन संस्थेकडून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमोर ठेवली जाणार आहे.
इफ्फीची जाहिरात देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये केली जाणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करण्याच्या उपक्रमाला कारवा असे नाव दिले गेले आहे. येत्या 16 रोजी चेन्नईमधून या जाहिरात पर्वाला आरंभ होईल. इफ्फीच्या आयोजनाविषयी प्रसार करणारे वाहन चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई आदी शहरांमध्ये फिरवले जाईल.