मुरगाव बंदरात अमोनिया गळती; प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:47 AM2023-06-07T11:47:53+5:302023-06-07T11:48:04+5:30
जहाजातून टाकीत अमोनिया भरताना घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: मुरगाव बंदरात अमोनिया साठा घेऊन आलेल्या जहाजातून तो बंदराच्या भूमिगत वाहिनीद्वारे अमोनिया टाकीत भरण्याची प्रक्रिया चालू असताना अचानक अमोनियाची गळती सुरू झाली. मंगळवारी (दि. ६) हा प्रकार घडला.
जहाजातून टाकीत अमोनिया भरताना गळती होत असल्याचे मुरगाव पोर्ट अॅथॉरिटी आणि पारादीप फॉस्फेट्सच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी, जवानांना कळताच त्यांनी त्वरित पावले उचलून गळती थांबवली. बंदरात सुरू झालेली अमोनिया गळती किरकोळ स्वरुपात होती, अशी माहिती वास्को अग्निशामक कडून प्राप्त झाली आहे. वास्को अग्निशमनचे प्रमुख दिलीप बिचोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १२.१० च्या सुमारास त्यांना मुरगाव बंदराच्या धक्का क्रमांक ८ वर अमोनिया गळती होत असल्याची माहिती मिळाली.
वास्को अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळावर धाव घेतली असता तिथे मुरगाव पोर्ट अॅथॉरिटी व पारादीप फॉस्फेट्सच्या अग्निशमन दलाचे जवान गळती रोखण्याचे काम करत होते. त्या दोन्ही दलाच्या जवानांनी त्वरित पावले उचलून आणि अमोनिया साठा घेऊन आलेल्या 'एस टी ओस्लो' जहाजाने टाकीत पाठवण्यात येणारा अमोनिया साठा बंद करून गळती थांबवली.
मुरगाव बंदरातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एस. टी. ओस्लो जहाज पारादीप फॉस्फेट्स कंपनीचा अमोनिया साठा घेऊन बंदराच्या धक्का क्रमांक ८ वर दाखल झाले. त्यानंतर जहाजातून मुरगाव बंदरातील अमोनिया टाकीत साठा भरण्याच्या कामाला सुरुवात झाली. जहाजातील अमोनिया साठा टाकीत भरण्यासाठी बंदरातील भूमिगत वाहिनीची जोडणी जहाजाला करण्यात येताना अचानक अमोनिया गळती सुरु झाली.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारण्यास सुरवात करून आणि अमोनिया गळती थांबवण्यासाठी इतर पावले उचलली. तसेच एस टी ओस्लो जहाजातील कर्मचाऱ्यांनी बंदरातील अमोनिया टाकीत साठा पाठवण्याचे काम बंद केल्याने धक्का क्रमांक ८ मध्ये सुरू झालेली गळती काही मिनिटातच बंद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपासणीनंतर साठा भरला जाणार
जहाजातून अमोनिया टाकीत साठा भरण्याचे काम सुरु केल्यानंतर अमोनिया गळती होण्यामागचे नेमके कारण काय त्याबाबत योग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपासणी आणि जेथे दुरुस्तीची गरज आहे ती झाल्यानंतर आणि सर्वकाही ठीक असल्याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच जहाजातील अमोनिया साठा टाकीत भरण्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.