उभयचर बस, सी प्लेन ठरले कागदी घोडे!, गोव्याचे पर्यटन प्रकल्प अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 01:03 PM2017-10-02T13:03:16+5:302017-10-02T13:03:30+5:30
गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) पर्यटकांना आकर्षित करणारे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदी घोडे बनून राहिले आहेत.
पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) पर्यटकांना आकर्षित करणारे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदी घोडे बनून राहिले आहेत. पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी चालणारी उभयचर बस, पाण्यात उतरणारे सी प्लेन आदी प्रकल्प प्रत्यक्षात येऊच शकले नाहीत. उभयचर बसला अजून केंद्र सरकारकडून परवानगी मिळू शकलेली नाही तर सी प्लेन चालवण्यासाठी अनुभवी पायलट मिळू शकललेला नाही.
पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल म्हणाले की, सी प्लेन चालवण्यासाठी हवाई वाहतूक संचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणारा पायलट असावा. मुख्य वैमानिकाला किमान ५00 तास आणि सह वैमानिकाला किमान १२५ तास उड्डाणाचा अनुभव असायला हवा. ही सेवा सुरू करण्यासाठी सुप्रिम ट्रान्स्पोर्ट प्रा. लि. या कंपनीची निवड केलेली आहे. देशात कुठेही सी प्लेनची सेवा नाही. गोव्यातच आम्ही ती प्रथम सुरू करणार आहोत.’
उभयचर बस हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या परवान्याची गरज आहे. ही बस महामंडळाकडे उपलब्ध आहे परंतु गेले वर्षभर ती पडून आहे. सी प्लेनसाठी किमान ५00 तास उड्डाण केलेला अनुभवी पायलट हवा आहे तो मिळत नाही. या प्रकरणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहून गोव्यासाठी काही नियम शिथिल करण्याची मागणी करणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.