नाताळनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण; जुने गोवा चर्च परिसर, पणजी चर्च स्क्वेअर येथे पर्यटकांची गर्दी
By समीर नाईक | Published: December 25, 2023 04:00 PM2023-12-25T16:00:25+5:302023-12-25T16:00:38+5:30
नाताळ सणानिमित्त सर्वाधिक गर्दी ही जुने गोवा येथील जगप्रसिद्ध चर्च बेसिलिका ऑफ बोम जिसस येथे पाहायला मिळाली
पणजी: नाताळ निमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी मध्यरात्रीपासून राज्यभरातील चर्चमध्ये प्रार्थना ऐकू येत होत्या. जे पहाटेपर्यंत सुरूच होत्या. सोमवारी देखील चर्चमध्ये लोकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राजकीय नेत्यांनी देखील गोमंतकियाना शुभेच्छा दिल्या आहेत.
नाताळ सणानिमित्त सर्वाधिक गर्दी ही जुने गोवा येथील जगप्रसिद्ध चर्च बेसिलिका ऑफ बोम जिसस येथे पाहायला मिळाली. या चर्चचे वैभव पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करते. गोमंतकियांची येथे श्रद्धा आहेसच, पण जगभरातील अनेक ख्रिस्ती, व इतर धर्मातील लोक या चर्च ला भेट देण्यासाठी व येथील वैभव अनुभवण्यासाठी येत असतात. सध्या विकेंड मिळाल्याने शनिवारपासून जूने गोवे येथे पर्यटकांनी गर्दी केली. सोमवारी पहाटेपासून भाविकांच्या मोठ्या रांगा होत्या.
लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. डिसेंबरमध्ये किनारी भागात पार्ट्यांना ऊत आलेले असते, याचाही आनंद पर्यटक लुटतात. त्यात राज्यातील नाताळ सण म्हणजे पर्यटकांना सोने पे सुहागाच असते. राज्यातील प्रत्येक वारसा स्थळे, प्रसिद्ध ठिकाण, व किनारी भागात पर्यटकांची अलोट गर्दी असते.
चर्चची विद्युत रोषणाई, गोटे, स्टार्स वेधतात लक्ष्य
राज्यातील अनेक चर्चनां नाताळ, व ख्रिस्ती नवीन वर्षानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पणजी चर्च स्क्वेअर तर या दिवसात पर्यटकांची सर्वाधिक पसंद असते. तसेच ठिकठिकाणी ख्रिस्ती बांधवांकडून खास आकर्षक गोटा तयार करण्यात आला आहे, जे सर्वांचेच लक्ष्य आपल्याकडे वेधून घेत आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर सजविलेले स्टार्स व ख्रिसमस ट्री हमखास दिसून येत आहेत. या सर्व गोष्टी सर्वाचेच लक्ष्य आपल्याकडे वेधत आहे.