गोव्याच्या पर्यटन हंगामाला आरंभीच दणका; इंग्लंडपाठोपाठ रशियन चार्टर विमानेही रद्द
By किशोर कुबल | Published: October 11, 2022 10:25 PM2022-10-11T22:25:50+5:302022-10-11T22:32:29+5:30
दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार या एअरलाइन्स कंपनीने १३ स्लॉट आरक्षित केले होते व पहिले रशियन चार्टर विमान काल मंगळवारी ११ रोजी येणार होते. चालू महिन्यात गोव्यात यावयाची आपली सर्व चार्टर विमाने या कंपनीने रद्द केली आहेत.
पणजी : इंग्लंडपाठोपाठ रशियाहून येणारी चार्टर विमानेही रद्द झाल्याने गोव्याच्या पर्यटन हंगामाला तो मोठा दणका ठरला आहे. नुकता कुठे पर्यटक हंगाम सुरु झाला असताना आझुर एअरलाइन्सने चालू महिन्याच्या मध्याला गोव्यात यावयाची आपली चार्टर विमाने रद्द केली आहेत.
दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार या एअरलाइन्स कंपनीने १३ स्लॉट आरक्षित केले होते व पहिले रशियन चार्टर विमान काल मंगळवारी ११ रोजी येणार होते. चालू महिन्यात गोव्यात यावयाची आपली सर्व चार्टर विमाने या कंपनीने रद्द केली आहेत.
राव म्हणाले की, ‘अन्य राष्ट्रांची चार्टर विमाने मात्र ठरल्याप्रमाणे येतील. येत्या १९ पासून आलमाटी येथून पहिले चार्टर विमान येणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने इंग्लंडच्या नागरिकांच्या पासपोर्टधारकांसाठी व्हिसा नियमात बदल केल्याने इंग्लंडहून येणारी अनेक चार्टर विमाने रद्द झालेली आहेत. त्या पाठोपाठ आझुर एअरलाइन्स कंपनीनेही रशियाची चार्टर विमाने रद्द केल्याने तो दणका ठरला आहे.
एका महितीनुसार ब्रिटिश पर्यटक साधारणपणे १४ दिवस गोव्यात राहतात. जास्त खर्च करणारे हाय एंड पर्यटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर रशियन पर्यटक तुलनेत कमी खर्च करतात. शॅकमालक, टुरिस्ट टॅक्सीवाले, हॉटेलमालक यांना ब्रिटिश पर्यटकांची प्रतीक्षा असते. गोव्याला भेट देणाºया पर्यटकांमध्ये सर्वात जास्त रशियन पर्यटक असतात. त्यापाठोपाठ ब्रिटिश पर्यटकांचा क्रमांक लागतो.काही वर्षांपूर्वी थॉमस कूक कंपनी बंद पडल्याने ब्रिटनहून येणाºया चार्टर विमानांवर परिणाम झाला होता. आता व्हिसा नियम बदलल्याने ब्रिटिश पर्यटकांच्या आगमनावर परिणाम झाला आहे.