जुआरीच्या पात्रात आढळली विजयादुर्गेची मूर्ती; ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला पुन्हा मिळाला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:52 PM2023-05-23T12:52:44+5:302023-05-23T12:54:05+5:30
५०० वर्षांपूर्वी सांकवाळमध्ये देवी विजयादुर्गाचे मंदिर असल्याची कथा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : कळंगूट येथील आयुश नाईक हा तरुण साकवाळ येथील जुआरी नदीत मासे पकडण्यासाठी गेला असता त्याला पात्रात देवी विजयादुर्गेची मूर्ती आढळली. ५०० वर्षांपूर्वी सांकवाळमध्ये देवी विजयादुर्गाचे मंदिर असल्याची कथा आहे. आता देवीची मूर्ती सापडल्याने या ठिकाणी विजयादुर्गेचे मंदिर असल्याचा पुरावा मिळाल्याची माहिती सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक यांनी दिली.
कळंगूट येथील आयुश नाईक सोमवारी (दि.२२) सांकवाळ येथील नदीत मासे पकडण्यासाठी आला होता. तेव्हाच त्याला पाण्यात मूर्ती असल्याचे दिसले. त्याने तत्काळ पात्रात उतरत मूर्ती बाहेर काढली, ती देवी विजयादुर्गेची असल्याची स्थानिकांनी सांगितले. यावेळी गावकऱ्यांच्या सांगण्यावरून आयुशने मूर्ती सांकवाळमधील एका गोशाळेत नेऊन ठेवली.
याबाबत आयुश म्हणाल की, ती मूर्ती मी ती घरी घेऊन जाणार होतो. मात्र, येथे देवीचे अस्तित्व असल्याचे अनेकजण सांगतात. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्याने ती मूर्ती गोशाळेत ठेवली.
आता मंदिर व्हावे
सांकवाळ गावात देवी विजयादुर्गेचे मंदिर असल्याचे अनेकजण सांगतात. ५०० वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. पोर्तुगीज काळात ते मंदिर केरी येथे स्थापित केल्याचेही काही ज्येष्ठ सांगतात. १९८४ मध्येही गावात सापडलेली मूर्ती पुरातत्व खात्याने नेली. सोमवारी पुन्हा पात्रात देवीची मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती संगमरवरी आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन गावात देवीचे भव्य मंदिर उभारण्याची मागणी पंच नाईक यांनी व्यक्त केली.