बेदरकार क्रेन चालकाने चिरडला एक निष्पाप जीव, मोटरसायकल पायलटचा मृत्यू

By आप्पा बुवा | Published: June 11, 2024 02:06 PM2024-06-11T14:06:05+5:302024-06-11T14:06:32+5:30

नवीन कदंबा बस स्थानकावर एका बेदरकार क्रेन चालकाने मोटरसायकल पायलट वर क्रेन घातल्याने, स्क्रीनच्या खाली चिरडून मोटरसायकल पायलटचा जागीच मृत्यू होण्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.

An innocent life crushed by a careless crane operator a motorcycle pilot dies | बेदरकार क्रेन चालकाने चिरडला एक निष्पाप जीव, मोटरसायकल पायलटचा मृत्यू

बेदरकार क्रेन चालकाने चिरडला एक निष्पाप जीव, मोटरसायकल पायलटचा मृत्यू

नवीन कदंबा बस स्थानकावर एका बेदरकार क्रेन चालकाने मोटरसायकल पायलट वर क्रेन घातल्याने, स्क्रीनच्या खाली चिरडून मोटरसायकल पायलटचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घडली आहे.
 

सविस्तर वृत्तानुसार न्यू कदंबा बस स्थानकावर मोटरसायकल पायलट चा व्यवसाय करणारे प्रकाश चोडणकर ( वय ५८, राहणार रामनाथी फोंडा) हे नेहमीप्रमाणेच आपल्या ग्राहकाची प्रतीक्षा करत मोटर सायकलवर बसून होते. सध्या बस स्थानकाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्याकरताच मोठ्या मशनरी व क्रेनचा वापर केला जात आहेत. त्यातीलच एका क्रेन चालकाने बेदरकारपणे क्रेन चालवली व भीषण अपघातास कारणीभूत ठरला.
 

सुरुवातीला त्याने एका प्रवासी बसला धक्का दिला. त्यानंतर तिथे ग्राहकाची प्रतीक्षा करत आपल्या मोटरसायकलवर बसलेल्या चोडणकर यांना मागून टक्कर दिली. ह्या धडकेत चोडणकर हे मोटरसायकल सह क्रेनच्या खाली आले. त्याचवेळी क्रेन चालकाने क्रेन थांबवायला हवी होती. मात्र त्याने क्रेन तशीच पुढे नेल्याने प्रकाश चोडणकर यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्याच्या मोटर सायकलच्या सुद्धा चुराडा झाला. फोंडा पोलिसांना सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गावकर यांनी सदर अपघाताचा पंचनामा केला आहे. चुकीच्या पद्धतीने क्रेन चालवून एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतल्याच्या कारणावरून फोंडा पोलिसांनी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 

नेमका आजच आला होता
 

सदर अपघातात मृत्यमुखी झालेले प्रकाश चोडणकर हे मागची अनेक वर्षे कदंबा बस स्थानक व इतर परिसरात मोटरसायकल पायलट चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. फोंडा पायलट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. या अगोदर ते एमआरएफ कंपनीमध्ये कामाला होते. तिथली नोकरी सुटताच त्यानी हा व्यवसाय सुरू केला होता. पाऊस पडत असल्याने मागचे काही दिवस प्रकाश चोडणकर हे कदंबा बस स्थानकावर व्यवसाय करण्यासाठी आले नव्हते. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने  ते बस स्थानकावर येऊन आपल्या ग्राहकांची प्रतीक्षा करत वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्याच वेळेस काळ बनून आलेल्या क्रेनने त्यांना चिरडले.
 

चोडणकर हे मूळ सातार्डा सिंधुदुर्ग इथले असून, मागचे अनेक वर्षे ते फोंडा येथे स्थायिक झाले होते. सुरुवातीला काही काळ दुर्गाभाट येथे वास्तव्य केल्यानंतर सध्या ते रामनाथी येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: An innocent life crushed by a careless crane operator a motorcycle pilot dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा