अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:19 PM2023-09-26T12:19:47+5:302023-09-26T12:20:55+5:30
गणपती विसर्जन आणि श्री अनंताचे व्रत यांचा समन्वय अनंत चतुर्दशीला होत असून याच दिवशी गणपती भूमातेशी एकरूप व्हावा म्हणून जलस्रोतात विसर्जन केले जाते.
- राजेंद्र पां. केरकर
२८ सप्टेंबर हा अनंत चतुर्दशी व्रताचा पवित्र दिवस. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य प्रांतात श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मान्सूनमध्ये श्री गणेशाचे होणारे आगमन उत्सव प्रेमींसाठी भक्तीबरोबर उत्साहवर्धक ठरले आहे. अनंत चतुर्दशी व्रत श्री विष्णूशी संबंधित असले तरी त्यादिवशी सार्वजनिकरीत्या संपन्न होणाऱ्या श्री गणेशाचे विसर्जन करण्याची परंपरा लोकमान्य टिळकांनी निर्माण केली होती.
श्री गणेश ही गजमुखी देवता सस्तन प्राण्याच्या विश्वातील सर्वात मोठा मेंदू आणि महाकाय शरीर लाभलेल्या सदाहरित जंगलाचे वैभव असणाऱ्या हत्तीशी संबंधित आहे. प्रारंभी विघ्नहर्ता असणारा हा देव कालांतराने सुखकर्ता आणि विघ्नहर्ता म्हणून पुजण्याची परंपरा रूढ झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांनी देशभरात ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध प्रकर्षाने आवाज उठवला. १ मे १९१६ रोजी त्यांनी हिंदी स्वराज्य संघाची स्थापना बेळगावात केली. भारतीय स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी आरंभलेल्या चळवळीमुळे सर व्हॅलेंटाइन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला त्या टिळकांनी स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सुरू केलेल्या गणेशोत्सवाला १८९४ मध्ये सार्वजनिक स्वरूप देऊन राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्य आकांक्षेची जोड दिली आणि त्याची सांगता अनंत चतुर्दशीला केली होती.
गोवा आणि महाराष्ट्रात गणपतीच्या मृण्मयी मूर्तीचे पूजन घरोघरी होत असले तरी सार्वजनिक स्तरावरही तो साजरा करण्याची परंपरा लोकप्रिय झाली आहे. लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाद्वारे निर्माण झालेल्या व्यासपीठाचा स्वराज्य आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत प्राधान्याने उपयोग करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोव्यातल्या पोर्तुगीज सत्तेविरुद्ध जेव्हा डॉ. राम मनोहर लोहियांनी १९५६ साली स्वातंत्र्यासाठी मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा त्याचवर्षी म्हापसा शहराजवळील पर्रा येथे सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ झाला होता. आज सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचा राष्ट्र आणि समाजाला एकसंध ठेवून विधायक कार्यासाठी काही मोजकीच मंडळे उपयोग करतात. त्यामुळे हा उत्सव हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण बरोबर समाज विघातक शक्तींच्या वृद्धीसाठी वापरला जाणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.
आपल्याकडे श्रावण महिन्यात विविध सण उत्सवांचे विशेष उत्साहात आयोजन केले जाते. त्यातले एक पर्व भाद्रपदात येणाऱ्या अनंत चतुर्दशीला संपते. जीवनात उद्भवणाऱ्या विविध आपत्तीतून मुक्तता व्हावी म्हणून चौदा प्रकारची फुले, फळे, धान्ये वापरून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याची परंपरा कोकणाप्रमाणे गोव्यातही आहे.
अनंत हे महानागाचे नाव असून श्रावणातल्या पंचमीला शुक्ल पक्षात नागपंचमी तर भाद्रपदातल्या शुक्ल पक्षातल्या चतुर्दशीला अनंत व्रतात नागाची रेशमी दोऱ्याच्या रूपात पूजा करून सर्प सृष्टीतल्या नागाच्या निसर्ग-पर्यावरणातील स्थानाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. भारतीय उपखंडात नागपूजनाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा असून नागपूजकांनी वैष्णव संप्रदायाची दीक्षा स्वीकारली तेव्हा ती नागपूजा, नागपंचमी आणि अनंत चतुर्दशीच्या व्रतात पाहायला मिळते.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या गणेशमूर्तीची स्थापना करून निर्माण झालेल्या व्यासपीठावर राष्ट्रप्रेम आणि भारतीयत्व विषयीची अस्मिता जागवण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन गोव्यात ठिकठिकाणी सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्याद्वारे उपलब्ध झालेल्या व्यासपीठाचा विविध विषयांबाबत लोकजागृती आणि पर्यावरणीय त्याचप्रमाणे मानवी मूल्ये बिंबवण्यासाठी उपयोग करण्याची नितांत गरज आहे.
महाभारत ग्रंथाची निर्मिती करताना त्याचे लेखन गणपतीने केल्याची कथा प्रचलित आहे. व्यासमुनींनी महाभारताचे कथन सतत दहा दिवस भाद्रपदात केले. मात्र एकाच जागी विराजमान झालेल्या गणपतीचे तापमान विलक्षण वाढले. त्याला शीतलता प्राप्त व्हावी म्हणून व्यासमुनींनी सरस्वती आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या संगमस्थळी गणपतीला स्नान करण्यास सांगितले. तो दिवस अनंत चतुर्दशीचा असल्याने कालांतराने याच दिवशी गणपती विसर्जन करण्याची परंपरा निर्माण झाली असावी. गणपती विसर्जन आणि श्री अनंताचे व्रत यांचा समन्वय अनंत चतुर्दशीला होत असून या दिवशीच मृण्मयी गणपती भूमातेशी एकरूप व्हावा म्हणून त्याचे विसर्जन जलस्त्रोतात केले जाते. आज हे गणपती विसर्जन पर्यावरण स्नेही होऊन आपले जीवन सुखकारक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे.