...आणि तो वटवृक्ष पुन्हा उभा राहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:50 AM2020-08-21T04:50:29+5:302020-08-21T04:53:50+5:30
निसर्गप्रेमींनी, पर्यावरणप्रेमींनी यंत्राद्वारे ते उभे केले आणि मृतप्राय वडाला जीवनदान मिळाले.
पणजी : इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते खोटे नाही. एक दोनशे वर्षांचे जुने वडाचे झाड - जे जवळपास चार पिढ्यांना सावली देत होते. सोसाट्याच्या वाऱ्याने जमीनदोस्त झाले. मात्र या झाडाच्या प्रेमात असलेल्या लोकांनी, निसर्गप्रेमींनी, पर्यावरणप्रेमींनी यंत्राद्वारे ते उभे केले आणि मृतप्राय वडाला जीवनदान मिळाले.
रशियापासून अनेकांनी त्यासाठी पैशांची उभारणी केली. स्थानिकांनी फक्त त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री गोळा केली आणि हे झाड उभे करण्यासाठी एक माणूस हैदराबादमधून आला. अनेकांच्या प्रार्थना फळाला आल्या आणि या झाडाच्या जीवात जीव आला!
पेडणे तालुक्यातील हरमलमधील हे वडाचे झाड स्थानिकच नव्हे तर या भागात नियमित येणारे पर्यटक, विशेषत: रशियन पर्यटकांचे विसाव्याचे स्थान. या झाडाभोवती कोंडाळे करूनच आपले नृत्य, संगीतादी शौक ते करत. दमल्यावर विसावा घेत. बर्लिन ते लंडन आणि रशिया ते गोवा अशा अनेकांचे या झाडाशी ऋणानुबंध होते. अशा प्रकारचे एक झाड चेन्नईत यापूर्वी पुनर्स्थापित केल्याची माहिती मिळताच अनेकांनी धावपळ सुरू केली.