आणि देवी शांतादुर्गा दिसली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 08:10 AM2024-01-09T08:10:43+5:302024-01-09T08:11:17+5:30

काही वर्षांपूर्वीचीच एक गोष्ट, गोष्ट नव्हे, सत्य प्रसंग.

and goddess shantadurga appeared | आणि देवी शांतादुर्गा दिसली...

आणि देवी शांतादुर्गा दिसली...

अॅड. राजेश नार्वेकर, निवृत्त अध्यक्ष प्रशासकीय लवाद

कधीमधी मी मंदिरात जातो; पण देवासाठी खण, प्रसाद, फुले, नारळ नेत नाही. फुले, नारळ हे देवानेच निर्माण केले आहेत. मग तेच देवाला अर्पून काय उपयोग? उलट देवाला लालूच दाखविण्याचाच तो एक प्रकार आहे, असे मला वाटते. माझे बाबा म्हणायचे, 'भुकेलेल्यांना खायला दिले तर देवाला पोहोचते.' माझा त्यावर विश्वास आहे आणि हा अंध विश्वास नाही...

काही वर्षांपूर्वीचीच एक गोष्ट, गोष्ट नव्हे, सत्य प्रसंग, सविता नावाच्या एका बाईचा पोटगीचा खटला डिचोली न्यायालयात सुरू होता. सविताच्या नवऱ्याने दुसऱ्या कुणा बाईच्या नादी लागून सविता व तिच्या दोन लहान मुलींना घराबाहेर काढले होते. सविता मुलींसह माहेरी राहत होती, नवऱ्याकडून तिला पोटगी मिळावी म्हणून मी न्यायालयात तिच्या वतीने अर्ज केला होता. सविता अस्नोड्याजवळ राहायची.

आमची कुलदेवता श्री शांतादुर्गा कणकेश्वरीचे मंदिर नार्वे गावी आहे. नार्वे गाव डिचोलीपासून काही अंतरावर आहे.
एक दिवस सविताच्या खटल्याच्या निमित्ताने मी डिचोलीला जाणार, हे माझ्या आईला समजले. तिने नारळ, फुले व खण (ओटी) हे साहित्य माझ्याकडे दिले व म्हणाली, देवीला माझी 'आंगवण' होती, हे साहित्य नार्वे देवळातील भटजीकडे दे व गा-हाणे घालायला लाव आणि हो, डिचोलीत मिठाई घेऊन देवीला दे. आईची मातेवर श्रद्धा होती.

दुपारी अडीच वाजता न्यायालये सुरू होतात. मी म्हापशाहून दुपारी एक वाजता गाडीने डिचोलीला निघालो. प्रथम नार्वे गावी गेलो. वाटेत डिचोलीला मिठाई घेतली. मंदिरात गेलो तेव्हा भटजी नव्हते. गर्भकुडीचे दार बंद होते. मी सगळे साहित्य व मिठाई कुडीच्या दाराबाहेर ठेवली, भटजींची वाट पाहत थांबू शकत नव्हतो. न्यायालयात जायला उशीर झाला असता.

सहज माझी नजर गर्भकुडीच्या द्वाराकडे गेली. त्या बंद लाकडी दरवाजाला फट होती. निदान मला देवीने व मी देवीला पाहावे असे मनात आले. मी फटीतून आत पाहिले तेव्हा त्या छोट्या फटीतून शांतादुर्गेचे डोळेच मला दिसले. मनात म्हटले, माते, आईच्या सांगण्यावरून हे तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे. त्याचा स्वीकार कर. देवी पाव!

मी वेळेवर न्यायालयात हजर झालो. त्याच दिवशी सविताला अंतरिम पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने तिच्या नवऱ्याला दिला. त्या आदेशाविरुद्ध नवऱ्याने पुढे सत्र न्यायालाय व उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले; पण दोन्हीही न्यायालयांनी सविताला पोटगी देण्याचा डिचोली न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला. असो; त्या दिवशी पुढे जे घडले ते मी तुम्हास सांगतो.

त्या दिवशी सविताबरोबर तिची सात- आठ वर्षांची लहान मुलगी आली होती. ती शाळेच्या गणवेशात होती. सविताकडून समजले की, दुपारी शाळा सुटल्यावर ती आईसोबत आली होती. तिने दुपारचे जेवणही घेतले नव्हते. ती भुकेलेली दिसत होती. मी सविताला थोडे पैसे दिले, म्हटले, 'जवळच हॉटेल आहे. तिला काही तरी खायला दे. सविता पैसे परत करीत म्हणाली, 'आता घरी जाऊन मी तिला जेवण वाढीन.' मी म्हटले, 'मी म्हापशाला चाललोय, वाटेत अस्नोड्याला तुम्हाला सोडतो,' मायलेक गाडीत मागच्या सीटवर बसल्या. डिचोलीला एका बेकरीपाशी गाडी उभी केली. वीस रुपयांची टोस्ट, बिस्किटे (पावापासून बनवतात ती) घेतली व म्हैसूरपाक घेऊन मुलीच्या हाती दिला, नार्वेला जाताना मी देवीसाठी म्हैसूरपाकच नेला होता, मुलीला म्हटले, 'म्हैसूरपाक खा, भूक कमी होईल. तिने आईची अनुमती घेऊन म्हैसूरपाक खायला सुरुवात केली. मी गाडी सुरू केली अन् म्हापशाच्या दिशेने निघालो. 

मी समोरील आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या त्या लहान मुलीकडे पाहत होतो. तिने हातातील खाऊ संपविला, बिस्किटांची पिशवी दोन्ही हातांनी छातीजवळ घट्ट पकडली होती. मध्येच मला मंदिरात ठेवलेल्या मिठाईची आठवण झाली. भटजी मंदिरात आले असतील का, त्यांनी मिठाईचा प्रसाद देवीला दाखविला असेल का, देवीला प्रसाद पोहोचला असेल का, अशा विचारांनी मनात गर्दी केली. 'देवी पाव!' मी मनात म्हटले. 

अस्नोड्याला पोचलो. 'देव बरे करू' म्हणत सविता उतरली. तिचे म्हणणे संपायच्या आत ती लहान मुलगी उद्‌गारली 'देवी पावली.' मी झटकन मागे वळून पाहिले. त्या मुलीच्या डोळ्यांकडे माझी नजर गेली. पाहतो तर काय... मंदिरात पाहिलेले श्री देवी शांतादुर्गेचे डोळे आणि त्या मुलीच्या डोळ्यांत विलक्षण साम्य होते. जणू त्या डोळ्यांनीच मला सांगितलं की, आईची आंगवण देवीला पोहोचली. मला बाबांचे शब्द आठवले, "भुकेलेल्यांना खायला दिलं तर देवाला पोहोचतं!' बाबांचे शब्द सत्यात उतरले होते.

 

Web Title: and goddess shantadurga appeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा