...आणि जुळून आले पर्रीकरांचे मिशन सालसेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:37 AM2019-03-18T00:37:42+5:302019-03-18T00:38:33+5:30
विक्रम आणि वेताळ कथांत राजा विक्रम न थकता जंगलात जाऊन वेताळाला पाठीवर मारून पुन्हा वाट चालू लागतो. मिशन सालसेतबाबत मनोहर पर्रीकरांनीही तेच केले. पूर्वी मिशन सालसेतने तीन चार वेळा हात पोळूनही त्यांनी २0१२ साली त्याला पुन्हा हात घातला आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
- सुशांत कुंकळयेकर
( मनोहर पर्रीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त लोकमतने हा लेख प्रसिद्ध केला. आज पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत. )
ख रेतर त्यापूर्वी चार वेळा ‘मिशन सालसेत’चा प्रयोग त्यांच्या अंगावरच शेकला होता़ भाजपा सत्तेत असतानाही सासष्टीने या पक्षाला कधीच जवळ केले नव्हते़ काही मतदारसंघात तर भाजप चंचूप्रवेशही करू शकला नव्हता़ अशी परिस्थिती असतानाही राजा विक्रमाप्रमाणे मनोहर पर्रीकर यांनीही आपला ‘मिशन सालसेत’चा हट्ट शेवटपर्यंत सोडला नाही़ २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या वेताळाला पुन्हा आपल्या खांद्यावर घेतलेच़
मात्र या वेळी परिस्थिती बदलली होती़ सत्तेवर असलेले काँग्रेस सरकार त्यातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या ओझ्याखाली एवढे दबून गेले होते ़ खनिज घोटाळ्यामुळे त्या वेळी सत्तेवर असलेल्या दिगंबर कामत सरकारची पतही खालावली होती़ पर्रीकर यांनीच विरोधी पक्षनेता असताना या प्रश्नावर रान उठवले होते़ एका बाजूला काँग्रेसची प्रतिमा मलीन झालेली असताना दुसऱ्या बाजूने दिल्लीहून गोव्यात काँग्रेसचे दूत बनून आलेल्या ब्रार व सुधाकर रेड्डी यांनी काँग्रेसच्या उमेदवाऱ्या अक्षरश: खिरापतीसारख्या वाटल्या़ गोव्यात बदनाम झालेल्या आलेमांव घराण्याला चार उमेदवाºया दिल्या गेल्या़ रवी नाईक यांनीही दोन उमेदवाºया आपल्या पदरात पाडून घेतल्या़ प्रतापसिंह राणे, पांडुरंग मडकईकर यांनीही तीच री ओढली़ अर्थातच त्यामागे त्या दोन्ही नेत्यांचे ‘अर्थकारण’ होतेच़ आणि त्यामुळे भाजपाला ‘फॅ मिली राज’चा मुद्दा आयताच कोलीत असल्यागत हाती लागला़ त्याचा लाभ न उठवला तर ते पर्रीकर कसले?
तरीही भाजपसमोर सर्वात मोठी कामगिरी होती ती अल्पसंख्याकांना आपल्या बाजूने ओढण्याची आणि ही कामगिरी पर्रीकर यांनी एक हाती करून दाखविली. भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी पर्रिकर यांनी संपूर्ण गोव्यात ‘परिवर्तन यात्रा’ घडवून आणली़ हिंदुबहुल भागात या यात्रेला उत्स्फू र्त पाठिंबा मिळत होता़ त्या वेळी मडगावात एका पत्रकार परिषदेत बोलताना पर्रीकर बोलून गेले, ‘तुम्हाला विश्वासही बसणार नाही़ कित्येक मतदारसंघात आम्ही आठ ते दहा हजारांच्या आघाडीने जिंकून येऊ़’ पर्रीकरांचे हे शब्द निवडणूक निकालानंतर अक्षरश: खरे ठरले़
या त्यांच्या परिवर्तन यात्रेत त्यांच्याबरोबर भाग घेतलेले आणखी एक नेते म्हणजे भाजपाचे तत्कालिन उपाध्यक्ष आणि सध्याचे एनआरआय विभागाचे आयुक्त डॉ़ विल्फ्रे ड मिस्किता.त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, ‘ख्रिस्ती मते भाजपाकडे आली ती केवळ मनोहर पर्रीकर या एका माणसामुळे़’ डॉ़ मिस्किता म्हणतात, ‘मी मगोत असताना सासष्टीने आम्हाला कधीच जवळ केले नाही़ उलट आमची ते नालस्तीच करायचे़ आम्हाला ते म्हणायचे, त्या कोकण्याबरोबर तुम्ही कशाला? ज्या सासष्टीत मगोच्या सभेवर लोकांकडून दगडफे क व्हायची, त्या सासष्टीने ख्रिस्ती मतदानाने २०१२ च्या निवडणुकीत भाजपाला जवळ केले ते केवळ मनोहर पर्रीकर या एका माणसाचे तोंड पाहूनच़ ’
गोव्याच्या राजकीय क्षेत्रात असा एक प्रवाद आहे की २०१२ च्या निवडणुकीत भाजपाला चर्चने पाठिंबा दिला़ त्यामुळेच गोव्यात ख्रिस्ती लोकांचे परिवर्तन झाले़ डॉ़ मिस्किता यांना हाही मुद्दा मान्य नाही़ ते म्हणतात, ‘आजपर्यंत कुठल्याही निवडणुकीत चर्च यंत्रणा स्वत:हून सामील झालेली नाही़ २०१२च्या निवडणुकीतही चर्चने निवडणुकीत भाग घेतला नव्हता़ फ क्त चांगल्या उमेदवारांना निवडून द्या आणि भ्रष्टाचाऱ्यांना घरी पाठवा एवढाच संदेश चर्चने दिला होता़ या निवडणुकीच्या पूर्वी आर्चबिशप फि लिप नेरी फे र्रांव यांची भेट घेण्यासाठी मनोहर पर्रीकर व सतीश धोंड यांच्याबरोबर मी स्वत: गेलो होतो़ त्या वेळीही आर्चबिशपने चर्च थेट निवडणुकीत भाग घेत नाही असे स्पष्टपणे सांगितले होते़ पण तरीही ख्रिस्ती लोकांनी भाजपाला मते दिलीच़ सासष्टीत भाजपाला पडलेली ख्रिस्ती मते त्या मानाने कमी असली तरी मुरगांव, काणकोण, म्हापसा, तिसवाडी, कुडचडे या भागात ख्रिस्ती लोकांनी भाजपाच्या पदरात बºयापैकी दान टाकले आणि याला कारणीभूत एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे मनोहर पर्रीकऱ’
गोव्यातील राजकारणात कित्येक पावसाळे बघितलेले आणि एक-दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा मिशन सालसेत अंगावर शेकून घेतलेले पर्रीकर यांना सासष्टीत भाजपाला तशी थेट मते मिळणार नाहीत याची जाणीव होती़ त्यामुळेच त्यांनी काँग्रेसपासून दुखावले गेलेले मिकी पाशेको आणि नावेली व वेळळी या दोन मतदार संघात अपक्षांशी जुळवून घेतले़ तशी नावेलीत भाजपाच्या मतांची संख्या कमी नाही़ मात्र गाठ बाहुबली चर्चिल आलेमांव यांच्याशी आहे हे हेरून त्यांनी आपला उमेदवार उभा न करता सर्वपक्षीय उमेदवार आवेर्तान फु र्ताद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. कुडचडेतही त्यांनी असेच सोशल इंजिनिअरिंग केले़ काँग्रेसचे आमदार श्याम सातार्डेकर यांना जवळचे असेलेले निलेश काब्राल यांना भाजपाची उमेदवारी देण्यास कित्येक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध होता़ वास्तविक कुडचडेत त्यांची उमेदवारी पर्रीकर यांनी जवळपास तीन चार महिन्यांपूर्वीच नक्की केली होती.मात्र बंडखोरी होऊ नये याचे तारतम्य राखत पर्रीकर यांनी शेवटच्या क्षणी ही उमेदवारी जाहीर केली.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत माध्यम प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले होते़ हिंदुबहुल भागात केवळ माध्यम प्रश्र्नाचाच वापर करून भाजपाने ही निवडणूक जिंकली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही़ पण तरीही दुसºया बाजूने म्हणजेच इंग्रजीवाल्यांनाही चुचकारण्याची चाल खेळण्यासही पर्रीकर मागे हटले नाहीत़ वास्तविक इंग्रजीवाल्यांची मागणी काँग्रेसने मान्य केली होती़ असे असतानाही इंग्रजीची मागणी लावून धरलेल्या ‘फ ोर्स’ या संघटनेनेही भाजपालाच आपला पाठिंबा दिला होता़ या संघटनेचे निमंत्रक सावियो लोपिस म्हणतात, ‘त्यावेळी परिस्थितीच अशी होती की काँग्रेसच्या शब्दावर कुणी विश्वास ठेवण्यास तयार नव्हता़ आम्हीही नव्हतो़ पर्रीकर यांची प्रतिमा त्यावेळी शब्दाला जागणारा नेता अशी होती़ आमच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक हाताळण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते़ त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला़’
आज या घटनेला बराच काळ उलटून गेला आहे़ गोव्यात भाजपाची प्रतिमा काहीशी खालावलेली आहे़ मात्र तरीही अल्पसंख्याक ख्रिस्ती मतदारांना अजूनही पर्रीकर ‘मसीहा’च वाटतात़ गोव्याचे भले व्हायचे असेल तर ते पर्रीकरच करू शकतील असे म्हणणारे ख्रिस्ती मतदार अजूनही सापडतात आणि एका अर्थाने पर्रीकर या व्यक्तीला अल्पसंख्याकांनी दिलेली ती पावतीच असते.