अंगणवाडी आहे परंतु वीज जोडणी नाही, सांगा चिमुकल्यांनी कसे शिकायचे

By आप्पा बुवा | Published: June 7, 2023 07:06 PM2023-06-07T19:06:03+5:302023-06-07T19:06:09+5:30

अप्पा बुवा / फोंडा - आज ज्या प्रमाणात वातावरणातील उष्णता वाढत आहे ते पाहता प्रत्येक खोलीत किमान एक लहानसा फॅन ...

Anganwadi is there but no electricity connection, how toddlers learn | अंगणवाडी आहे परंतु वीज जोडणी नाही, सांगा चिमुकल्यांनी कसे शिकायचे

अंगणवाडी आहे परंतु वीज जोडणी नाही, सांगा चिमुकल्यांनी कसे शिकायचे

googlenewsNext

अप्पा बुवा / फोंडा - आज ज्या प्रमाणात वातावरणातील उष्णता वाढत आहे ते पाहता प्रत्येक खोलीत किमान एक लहानसा फॅन गरजेचा बनला आहे. आजच्या घडीला फॅन शिवाय जगणे उष्ण हवामानात तापदायक होऊ शकते. असे असतानाही बेतकी -खांडोळा पंचायत कार्यालय मागे असलेले बागवाडा येथील अंगणवाडी केंद्र मात्र गेल्या कित्येक वर्षापासून वीज जोडणी पासून वंचित आहे. 

वीज पुरवठा नसल्याने लहान मुलांना केंद्रात बसून राहणे आरोग्यासाठी हितकारक नाही. सरकारने सुसज्ज बांधलेल्या अंगणवाडी केंद्रात वीज जोडणी देवून मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची मागणी पालक करू लागले आहेत. सविस्तर वृत्तानुसार बागवाडा येथील भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या सोयीसाठी २००७ साली  सुसज्ज इमारत उभारण्यात आली होती. अंगणवाडी इमारत बांधून पूर्ण झाली तरीही दहा वर्षे सदर अंगणवाडीत मुलांचा किलबिलाट ऐकू येत नव्हता. त्याची कारणे नक्की काय हे सुद्धा अजूनही लोकांना कळलेले नाही.

काही कारणामुळे लांबलेले मुलांचे स्थलांतर २०१७ साली नवीन इमारतीत शेवटी करण्यात आले. सुरुवातीला सुमारे ५० हून अधिक मुले अंगणवाडी केंद्रात जात होती. त्यानंतर गेल्या ३-४ वर्षापासून सरासरीने ३५ मुले अंगणवाडीत येतात. परंतु केंद्रात वीज जोडणी नसल्याने मुलांना उन्हाळ्यात  त्रास सहन करावा लागत आहे. 

काही पालकांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांचे स्थलांतर नवीन इमारतीत केल्यानंतर वीज जोडणी साठी प्रयत्न सुरू केले होते.  वीज जोडणीसाठी पालकांनी अनेक राजकीय नेत्यांकडे प्रश्न सोडविण्यासाठीची विनंती केली होती.परंतू प्रशासकीय यंत्रणेला ना चिमुकल्या जीवाची चिंता ना पालकांच्या चिंतेची तमा.  गेल्या काही दिवसापासून राज्यभर कधी नव्हे एवढा गरमीचा पारा चढला आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात उष्णतापमान वाढलेले असून अनेक पालकांनी मुलांना घरी ठेवणे पसंद केले आहे. 

ज्या ठिकाणी लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हायला हवी त्याच ठिकाणी योग्य ती साधन सुविधा देण्यास सरकार कमी पडत आहे. अशाने मुलांना शिक्षणाचे गोडी लागणारच नाही. आजच्या घडीला तिथे एवढे तप्त वातावरण असते नको ते बालशिक्षण म्हणण्याची पाळी-पालकावर आली आहे. सरकारने निदान पुढच्या शैक्षणिक वर्षापर्यंत तरी सदर अंगणवाडीला वीजपुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेतकी -खांडोळा पंचायतीचे सरपंच विशांत नाईक म्हणतात की बागवाडा येथील अंगणवाडी केंद्रात पंचायत कार्यालयातील नळाचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.  तसेच वीज जोडणी घेण्यासाठी ना हरकत दाखला सुद्धा देण्यात आला आहे.

Web Title: Anganwadi is there but no electricity connection, how toddlers learn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.