कामावरून काढल्याचा राग आला; अल्पवयीन मुलाचा खून केला, संशयित रेल्वेतून पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 09:58 AM2024-09-23T09:58:40+5:302024-09-23T10:01:06+5:30
संशयित शेगाव येथील असल्याची माहिती, पोलिसांकडून शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : विठ्ठलापूर-साखळी येथे शनिवारी मध्यरात्री एका बारा वर्षे मुलाच्या डोक्यावर दगड घालून खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली.
आपल्याला कामावरून काढल्याने रागाच्या भरात नवीन रुजू झालेल्या कामगाराच्या लहान भावाला रात्रीच्या वेळी गोठ्याजवळ बोलावून त्याचा खून करण्यात आला. चंदू पाटील (३१, रा. शेगाव, महाराष्ट्र), असे संशयिताचे नाव आहे. डिचोली पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करून सदर इसमाने डेअरी मालकाची दुचाकी घेऊन तो थिवी रेल्वे स्टेशनवर गेला व तिथून रेल्वेने पसार झाला असून, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार, विठ्ठलापूर येथील एका डेअरी फार्ममध्ये संशयित चंदू पाटील हा कामावर होता. मात्र, तो दारू पित असल्याने मालकाने त्याला कामावरून कमी केले. डेअरी मालकाने उत्तर प्रदेशमधील अर्ष अली या कामगाराला दोन दिवसांपूर्वीच, दि. १९ रोजी कामाला ठेवले होते. तो आपल्या बारा वर्षीय भावासह आला होता. त्यामुळे चंदू पाटीलने नवीन कामगाराशी आणि मालकाशी वाद घातला होता.
आपल्याला कामावरून काढून दुसऱ्याला कामावर ठेवल्याचा राग आल्याने चंदू याने शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास येथे येऊन झोपलेल्या त्या कामगाराच्या १२ वर्षीय भावाला उठवले. त्याला गोठ्याशेजारी नेऊन तेथे डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर संशयित डेअरी मालकाची दुचाकी घेऊन रेल्वे स्टेशनपर्यंत गेला. तेथून तो पसार झाल्याचे समजते.
डेअरीशेजारील खोलीत झोपलेल्यांपैकी एकाला पहाटे चारच्या सुमारास जाग आली. त्याने पाहिले असता आर्षचा भाऊ तेथे नसल्याचे दिसले. खोलीबाहेर पाहिल्यावर तो रक्तबंबाळ अवस्थेत सापडला. त्यानंतर डेअरी मालकांना तातडीने याची माहिती देण्यात आली. डिचोली पोलिसांनी घटनास्थळी पुरावे गोळा केले असून त्यात वापरला दगड व इतर वस्तू ताब्यात घेण्यात आल्या.
रेल्वेतून संशयित पसार
फरार झालेला संशयित चंदू हा शेगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या कसून तपास सुरू केला आहे. बारा वर्षीय मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले आता त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बंबोळी येथे पाठवला असून, याप्रकरणी तपास सुरू आहे. तो रेल्वेने पसार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.