दिगंबर, चर्चिलच्या मालमत्तेवर टाच
By admin | Published: March 31, 2017 02:45 AM2017-03-31T02:45:05+5:302017-03-31T02:51:14+5:30
पणजी : गाजलेल्या लुईस बर्जर भ्रष्टाचार प्रकरणात कॉँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या १.२० कोटी रुपयांच्या
पणजी : गाजलेल्या लुईस बर्जर भ्रष्टाचार प्रकरणात कॉँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या १.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी विभागाने (ईडी) गुरुवारी टाच आणली. याच प्रकरणात आमदार चर्चिल आलेमाव यांच्या ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेवरही टाच आणली. दोघांच्याही जितक्या मालमत्तेवर टाच आणली तितक्याच रकमेचा भ्रष्टाचाराचा ठपका गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांच्यावर ठेवला आहे. दोघेही आमदार आता अडचणीत आले आहेत.
दिगंबर कामत यांच्या घोगळ-मडगाव येथील ४ हजार ४७ चौरस मीटर भूखंड, ताळगाव येथील रहिवासी बंगला आणि ४१ लाख ३५ हजार रुपयांच्या ठेवींवर टाच आणली आहे. चर्चिल आलेमाव यांच्या ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेत फात्राडे-वार्का येथील आठ सदनिकांचा समावेश आहे. या सर्व मालमत्तेचे मूल्यांकन २००९ मधील दराप्रमाणे केले आहे. दोघांची टाच आणलेल्या मालमत्तेची एकूण रक्कम ही १ कोटी ९५ लाख रुपये होते.
जैका प्रकल्पात कंत्राट लाटण्यासाठी
लुईस बर्जर कंपनीने मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा खुलासा अमेरिकेच्या न्यायालयात केला होता. नंतर तपासात तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांची नावे स्पष्ट झालेली होती. त्यानंतर गोव्यात या प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाकडून आणि नंतर अंमलबजावणी विभागाकडूनही दोघांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर चर्चिलना अटक केली होती, तर दिगंबर कामत यांनी अटकपूर्व जामीन मिळविल्यामुळे ते अटकेपासून बचावले होते. चर्चिल आलेमाव यांना एक महिन्याहून अधिक काळ कोलवाळ येथील तुरुंगात काढावा लागला होता. त्याच्या पूर्वी जैकाचे माजी प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर यांनाही अटक केली होती. त्यांच्याकडून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे कलम १६४ अंतर्गत कोणी कोणी दलाली घेतली याचा खुलासा झाल्यानंतर चर्चिल आणि कामत यांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. राजकीय व्यक्ती आणि अधिकारी यांना दिलेली लाच ही हवालामार्फत दिली होती आणि हवाला एजंट रायचंद सोनीलाही पोलिसांनी अटक केली होती.
नऊ कबुली जबाब
या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी या प्रकरणात एकूण ९ जणांचे पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कलम १६४ अंतर्गत कबुली जबाब नोंदविण्याचे धाडस दाखविले होते. सर्वच्या सर्व ९ जणांनी पोलीस तपासाला पूरक अशाच जबान्या दिल्या. सावंत यांच्या या कामगिरीमुळे नंतर त्यांचा पोलीस महासंचालकांनी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानही केला. (पान कश् वर)