म्हादयीच्या बाबतीत दोन दिवसात कृती आराखडा जाहीर करा, अन्यथा राजीनामा द्या, विजय सरदेसाईंचे मुखमंत्र्यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 10:28 PM2020-10-04T22:28:16+5:302020-10-04T22:30:44+5:30
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात आलेवेळी म्हादयी प्रश्नावर न बोलता या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आता मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
मडगाव - केंद्राच्या दडपणाखाली गोव्यातील भाजप सरकारने म्हादयी विकल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. अन्यथा म्हादयी वाचवण्यासाठी आणि कर्नाटकात वळविण्यात आलेले पाणी पुन्हा गोव्यात आणण्यासाठी सरकारचा कृती आराखडा काय हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसात जाहीर करावे असे आव्हान दिले आहे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात आलेवेळी म्हादयी प्रश्नावर न बोलता या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आता मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
जर म्हादयीबाबत सरकारकडे लपविण्यासारखे काही नव्हते तर केंद्रीय मंत्र्यांनी या प्रश्नावर बोलण्याचे का टाळले असा सवाल त्यांनी केला.ते म्हणाले , दोन दिवसात जर मुख्यमंत्री कृती आराखडा सादर करू शकत नाही. तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि विधानसभाही बरखास्त करावी. या पुढील निवडणूक म्हादयी प्रश्नावर होऊ द्या. उगीच आम्ही लोकांबरोबर आहोत असे सांगून वेळ मारून नेऊ नका, केंद्र सरकार तुमचे ऐकत नसेल तर राजीनामा द्या आणि म्हादयीसाठी पुन्हा रिंगणात उतरा असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. हे सरकार पाडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्व गोवावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गोवा वाचवायचा असेल तर याची नितांत गरज आहे असे ते म्हणाले.
म्हादयी पाणी तंटा लवादाने कर्नाटकाला पिण्यासाठी पाणी घेण्याची परवानगी देताना हे करण्यापूर्वी गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातील तज्ज्ञांची समिती नेमण्यास सांगितले होते. पण ही समिती नेमण्यापूर्वीच कर्नाटकाने पाणी वळवले आहे. राज्य सरकारचे अधिकारीही हे मान्य करतात. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण या महत्वाच्या प्रश्नावर गोवा सरकार मागचा एक महिना झोपून आहे आणि या सरकारचे मंत्री निलेश काब्राल मात्र या प्रश्नावर आम्ही लोकांबरोबर आहोत असे सांगत आहेत. हा दुटप्पीपणा का असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हादयी आपल्याला आईसारखी असे म्हणतात पण प्रधानमंत्री मोदी यांना ते भेटले त्यावेळी ते या संबंधी एकही शब्द बोलत नाहीत, उलट त्यांचा सहभाग गोव्यातील बेकायदेशीर खनिज व्यवसायात असल्याने फक्त खनिज व्यवसाय गोव्यात कसा सुरू केला जाऊ शकतो यावर बोलून येत आहेत. यावरून काय समजावे असा सवाल त्यांनी केला.
सरदेसाई म्हणाले, जावडेकर यांनीच म्हादयीचे पाणी वळविण्याचा आदेश दिला. त्यांनीच मोले नष्ट करणाऱ्या प्रकल्पाना मंजुरी दिली. महामारीच्या स्थितीचा फायदा उठवून या सरकारने गोवा विकायला काढला असून गोवा सरकारचीही त्याला समंती आहे. ड्रोनच्या साहाय्याने जे चित्रीकरण करण्यात आले आहे त्यातून म्हादयीचे पाणी कर्नाटकने वळविले आहे हे स्पष्टपणे दिसते. यासाठीच यंदा विक्रमी पाऊस पडूनही म्हादयी केवळ ओढ्यासारखी वाहत आहे. दूधसागरही आटू लागला आहे असे स्थानिक लोक सांगतात. मात्र गोवा सरकार डोळे झाकून गप्प बसले आहे असा आरोप त्यांनी केला. या सरकारचे पापाचे घडे भरले आहेत गोव्याची जनताच त्यांना धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला