वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात आरक्षण देण्याची घोषणा करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 08:02 AM2023-03-29T08:02:31+5:302023-03-29T08:02:57+5:30
'प्रशासन तुमच्या दारी' या कार्यक्रमावेळी केपे येथे दि. १७ रोजी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा विभागाच्या सदस्यांनी भेट घेतली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा वेद्यकीय महाविद्यालयातवैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी एसटी, एससी, ओबीसी समाजासाठी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा विभागाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.
'प्रशासन तुमच्या दारी' या कार्यक्रमावेळी केपे येथे दि. १७ रोजी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा विभागाच्या सदस्यांनी भेट घेतली होती. त्यांच्या समोर ही मागणी सादर केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी १० दिवसांत त्यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही सरकार दरबारी कुठलीच हालचाल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
नाईक म्हणाले की, वैद्यकीय तसेच दंतचिकित्सा पदव्युत्तर शिक्षणासाठी एसटी, एससी, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. अन्य राज्यांमध्ये तेथील या तिन्ही समाजांच्या विद्यार्थ्यांना आरक्षण दिले जाते. मग गोव्यातच त्याची अंमलबजावणी का होत नाही. सरकारच्या धोरणामुळे या समाजाचे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरक्षण नसल्याने त्यांना प्रवेश मिळण्यास अडचण येत आहे.
या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सादर केले आहे. दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिल्ली येथील जंतर-मंतर येथे एसटी, एससी, ओबीसी समाजासाठीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी आंदोलनाला गोव्यातूनही पाठिंबा असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनाकडे समाजाचे लक्ष
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉ व दंतचिकित्सा महाविद्यालयात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी एसटी, एससी, ओबीसी समाजाला आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"