गोव्यात मातृभाषाप्रेमींकडून राजकीय पक्षाची घोषणा
By Admin | Published: August 29, 2016 07:55 PM2016-08-29T19:55:32+5:302016-08-29T19:55:32+5:30
राज्यात डायोसेशन संस्थेकडून चालविल्या जाणा-या 135 इंग्रजी शाळांचे अनुदान बंद केले जावे या मागणीच्या पूर्ततेसाठी आंदोलन करणा-या भारतीय भाषा सुरक्षा
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 29 - राज्यात डायोसेशन संस्थेकडून चालविल्या जाणा-या 135 इंग्रजी शाळांचे अनुदान बंद केले जावे या मागणीच्या पूर्ततेसाठी आंदोलन करणा-या भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या(भाभासुमं) रडारवर आता म.गो. पक्षही आला आहे. येत्या दि. 30 सप्टेंबरपर्यंत म.गो.ने भाजपशी युती तोडून सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहन भाभासुमंने केले आहे. तसेच म.गो. युती तोडत नसल्यास भाभासुमं नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करून निवडणूक लढवील, असे प्रा. सुभाष वेलिंगकर, अॅड. उदय भेंब्रे आदींनी सोमवारी येथे जाहीर केले.
भाभासुमंची शुक्रवारी बैठक झाली. त्या बैठकीतील निर्णयांची माहिती वेलिंगकर, भेंब्रे, पुंडलिक नाईक, स्वाती केरकर, फादर आताईद, सुभाष देसाई आदींनी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर आमचा किंचितही विश्वास राहिलेला नाही. सरकार इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करणार नाही हे आम्हाला कळाले आहे. त्यामुळे आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव घडवून आणण्यासाठी उमेदवार उभे करू. म.गो. पक्षाने प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी आतार्पयत आमच्या भूमिकेस पाठींबा दिला आहे. म.गो. या एकमेव राजकीय पक्षाने आम्हाला प्रतिसाद दिला. मात्र भाजपशी या पक्षाने युती तोडावी लागेल. त्यासाठी आम्ही येत्या दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देत आहोत. भाजपशी युती तोडली तरच येत्या निवडणुकीत भाभासुमंचा म.गो. पक्षाला पूर्ण पाठिंबा असेल पण युती तोडली जात नसेल तर भाजप व म.गो. या दोन्ही पक्षांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करू, असे वेलिंगकर व भेंब्रे यांनी सांगितले.
एकूण चाळीसपैकी 35 मतदारसंघांमध्ये आम्हाला संभाव्य उमेदवार मिळाले आहेत. उमेदवारांची यादी तयार आहे. नव्या पक्ष स्थापनेचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी अॅड. हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांब्रे, वल्लभ केळकर व अॅड. स्वाती केरकर यांचा समावेश असलेली एक समिती निवडण्यात आली आहे. पक्षाचे नाव यापुढे जाहीर केले जाईल. निवडणुकीस पाच-सहा महिने असताना शिक्षणतज्ज्ञांची समिती सरकारने नेमली आहे. म्हणजे याबाबतही लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. भाभासुमंचा प्रभाव वाढत असून आनंद शिरोडकर, विनायक च्यारी, देवानंद नाईक असे पूर्णवेळ कार्यकर्ते त्यांचे सगळे व्यवसाय सोडून भाभासुमंच्या चळवळीत पूर्णवेळ काम करत आहेत. मातृभाषा रक्षक अभियान आम्ही आरंभिले असून आतार्पयत दहा हजार रक्षकांना प्रतिज्ञा देण्यात आली. उत्तर गोव्यात 36 व दक्षिणोत 30 असे 25 विधानसभा मतदारसंघात आतार्पयत 66 मातृभाषा रक्षक कार्यक्रम पार पडले. येत्या दि. 31 ऑक्टोबर्पयत दोन लाख मातृभाषा रक्षक तयार होतील.
संघावर दबाव नाही- वेलिंगकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण व्हावे अशी आहे. संघाच्याच सिद्धांतासाठी आम्ही लढत आहोत. आमच्यावर किंवा गोव्यातील संघावर कोणताही दबाव नाही. यापूर्वी भाभासुमंच्या सगळ्य़ा बैठका व सभांवेळी कार्यकत्र्यावर दबाव आणून सत्ताधारी भाजपने आमचे प्रयत्न अयशस्वी करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरुवातीपासून भाषा सुरक्षा मंचसोबत आहे. आमची भूमिका बदलणार नाही, असे वेलिंगकर यांनी सांगितले.
म.गो.ची 25 पर्यंत बैठक
दरम्यान, म.गो.चे अध्यक्ष व मंत्री दिपक ढवळीकर यांनी रात्री लोकमतला सांगितले, की येत्या दि. 25 सप्टेंबर्पयत म.गो.ची केंद्रीय समिती व कार्यकारी समिती यांच्या बैठका होतील. गरज पडल्यास आम्ही पक्षाची आमसभाही बोलावू. निवडणुकीशीसंबंधित सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाईल. माध्यम प्रश्न, मराठी राजभाषेचा विषय व अन्य काही राजकीय विषयांवर त्या बैठकांमध्ये विचारमंथन केले जाईल.
(खास प्रतिनिधी)