दिगंबरांवर आणखी एक गुन्हा
By admin | Published: August 17, 2015 01:36 AM2015-08-17T01:36:38+5:302015-08-17T01:36:54+5:30
पणजी : लुईस बर्जर-जैका लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भारतीय दंडसंहिता कलम
पणजी : लुईस बर्जर-जैका लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भारतीय दंडसंहिता कलम २०१ अन्वये नोंद केला आहे. मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा आणि जैकाचे सर्वेक्षण अधिकारी उदयकुमार मांडेवलकर यांच्यावर कामत यांना साथ देण्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद केला आहे. या दोघांना अटक होण्याचीही शक्यता आहे.
जैका लाचखोरी प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात आणखी कलमे वाढविली आहेत. तसेच संशयितही वाढले आहेत. कामत यांनी माहिती हक्क कायद्याखाली (आरटीआय) मागितलेली माहिती जैकाचे सर्वेक्षण अधिकारी आणि माहिती हक्क अधिकारी उदयकुमार मांडेवलकर यांनी चुकीची दिली होती. जैका प्रकरणात पोलिसांना हवी असलेली फाईल क्राईम ब्रँचकडे असल्याचे उत्तर त्यांनी कामत यांना दिले होते. हे उत्तर त्यांनी कामत यांच्या दबावामुळे दिल्याचा क्राईम ब्रँचचा दावा आहे. आरटीआयखाली मागितलेली ही माहिती नेण्यासाठी मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा आले होते. त्यांना ही माहिती मांडेवलकर यांच्याकडून दिली होती. त्यामुळे या प्रकरणात मांडेवलकर आणि डिसिल्वा यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेचीही शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय दंड संहिता कलम २०१ हे पुरवा नष्ट करण्याच्या संदर्भात लावले जाते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास किमान दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. खून, दरोडे याबाबतच्या गुन्ह्यांत हे कलम लावले तर मोठी शिक्षा आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत लावले आणि गुन्हा सिद्ध झाला तर कमी शिक्षा दिली जाते. लुईस बर्जर प्रकरणात हे कलम आरटीआयखाली मागितलेल्या माहितीवरून आणि त्यासाठी दिलेल्या उत्तराचा आधार घेऊन लावले आहे.
(प्रतिनिधी)