म्हापशातील श्री देव बोडगेश्वर मंदिरात पुन्हा चोरी; गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिर टार्गेट
By काशिराम म्हांबरे | Published: April 29, 2024 11:25 AM2024-04-29T11:25:44+5:302024-04-29T11:25:56+5:30
गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिरांना टार्गेट केले जाते. मागील तीन महिन्यात विविध भागातील मंदिरात चोरीचे प्रकार घडले आहे
म्हापसा- गोव्यासह महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले तसेच जागृत देवस्थान म्हणून मानले जाणाऱ्या म्हापसा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव बोडगेश्वर संस्थानच्या मंदिरात दोन महिन्यानंतर पुन्हा दुसऱ्यावेळी धाडसी चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी मंदिरातील दोन फंडपेटी फोडून त्यातील अंदाजीत १२ लाख रुपयांची रोखड रक्कम लंपास केली आहे.
गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिरांना टार्गेट केले जाते. मागील तीन महिन्यात विविध भागातील मंदिरात चोरीचे प्रकार घडले आहे. चार बुरखाधारी चोरट्यांनी मंदिराच्या सुरक्षा रक्षकाला आरंभी मारहाण करून नंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याता खुर्चीला बांधून मुर्ती समोर असलेल्या तसेच मागच्या बाजूला असलेल्या फंडपेटीतील कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. सदर चोरीची घटना आज सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमाराला घडली आहे.
दोन महिन्यापूर्वी २८ मार्च रोजी पहाटे ४.३० च्या दरम्यान चोरट्यांनी पादूकांची पेटी फोडून त्यातील रक्कम चोरली होती. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपास कार्य सुरु करून कर्नाटकातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले होते. हा घटनेनंतर घडलेला हा दुसरा चोरीचा प्रकार आहे.
प्रथम चार बुरखाधारी चोरट्यांनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला. नंतर मंदिराच्या आवारात सुरक्षा पुरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेऊन त्याला बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरातील दोन फंडपेटी फोडून त्यातून रोख रक्कम पळवून नेली. घटनेची माहिती उपलब्ध होता. देवस्थानच्या समितीची घटना स्थळी धाव घेतले. त्यानंतर चोरीची माहिती म्हापसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून तपास कार्य सुरु केले आहे. मंदिरातील सिसिटिव्ही फुटेजची तसापणी केली जात आहे.
दर दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. खास करुन बुधवार तसेच विवारच्या दिवशी भाविकांच्या रांगा मंदिरात देवदर्शनासाठी लागलेल्या असतात. भाविक केलेल्या नवसानुसार देवाला वस्तू अर्पणही करीत असतात. घटना पहाटे घडल्याची माहिती अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली. या संबंधी आपण तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले.