मगोपला न्यायालयात उत्तर देणार - विनय तेंडुलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 04:54 PM2018-11-21T16:54:42+5:302018-11-21T16:56:34+5:30
मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही.
पणजी - मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही. त्या याचिकेला भाजप योग्य ते उत्तर न्यायालयातच देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मगोपचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी मगोपकडून भाजपला पाठींबा दिला जाईल याचीही खात्री आहे, असे तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद तानावडे म्हणाले.
मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे विविध विधाने करून लोकांची करमणूक करत आहेत. सरकार चांगले चालले आहे. मंत्री सुदीन ढवळीकर हेही सरकारमध्ये चांगले काम करत आहेत. मगोपने उच्च न्यायालयात याचिका सादर करून सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो. मगोपवर आम्ही याचिका मागे घेण्यासाठी कसलाच दबाव टाकत नाही. त्या पक्षाने याचिका मागे घ्यावी अशी आम्ही विनंती देखील करत नाही. न्यायालयच काय तो निवाडा देईल, असे तेंडुलकर व तानावडे म्हणाले.
मगोपचे मंत्री ढवळीकर हे गोव्याबाहेर असल्याने बुधवारी आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण मंत्री बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर ह्या दोन्ही मगो आमदारांशी आम्ही बोललो. ते सरकारसोबतच आहेत. त्यांची काही तक्रार नाही. मगोपचे अध्यक्ष ढवळीकर हे हास्यास्पद बोलत व वागत आहेत. मगो पक्षातच फुट पडेल असे कदाचित दिपक ढवळीकर यांना वाटत असावे व त्यामुळे न्यायालयात धाव घेतली गेली असावी, असे तेंडुलकर म्हणाले. ज्येष्ठ मंत्र्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा द्यावा, अशी मागणी मगो पक्ष करत असल्याविषयी पत्रकारांनी विचारताच भाजपचे केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय योग्यवेळी घेईल एवढेच तेंडुलकर यांनी सांगितले. आम्ही केंद्रीय नेत्यांच्या रोज संपर्कात असतो असे ते म्हणाले.
मगोपने लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला असल्याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणाले, की सुदिन ढवळीकर हे मगोपचे विधिमंडळ नेते आहेत. मगोकडून लोकसभा निवडणुकीवेळी व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही भाजपला सहकार्य मिळेल. मगोपचे उमेदवार रिंगणात नसतील याची काळजी मंत्री ढवळीकर घेतील. काँग्रेसविरुद्ध केवळ भाजपचेच उमेदवार असतील.
दरम्यान, भाजपचे सगळे आमदार पुढील विधानसभा अधिवेशनावेळी अधिवेशनास उपस्थित राहतील, असेही तेंडुलकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नादाखल सांगितले. भाजपचे तीन-चार आमदार असाध्य आजारामुळे अंथरुणास खिळलेले आहेत, असे मगोपने याचिकेत म्हटले आहे. त्यावर तेंडुलकर यांनी तसे काही नाही, आमचे आमदार सुस्थितीत आहेत, असे सांगितले.