आज चलो चांदर; कोळसा विरोधी आंदोलन अधिक तीव्र होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 02:11 PM2020-11-01T14:11:04+5:302020-11-01T14:12:24+5:30
रात्री चांदर फटकासमोर निदर्शने
मडगाव: गोव्यात सुरू असलेले कोळसा विरोधी आंदोलन आज रविवारी रात्रीपासून अधिक तीव्र होणार असून रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी आज रात्री मोठ्या प्रमाणावर आंदोलक चांदर - गिर्दोळी फटकाकडे जमणार आहेत..या आंदोलनाला काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
आज रात्री 10.30 वाजता दुपदरीकरणाला विरोध करणाऱ्या सर्व आंदोलकांनी चांदर येथे जमावे असे आवाहन गोयांत कोळसो नाका या संघटनेने केले आहे. गोवा अदानी, जिंदाल आणि वेदांता या कंपन्यांना आंदण देण्याचे राज्य सरकारचे कारस्थान मोडून काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आज रात्री ख्रिस्ती लोकांचा ' ऑल सेन्ट्स डे' हा पवित्र दिवस असल्याने आज मध्यरात्री चांदरचे रेल्वे फाटक
बंद ठेवून काम करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी मागे घ्यावी यासाठी सरकारला जवळ असलेल्या चर्चिल आलेमाव आणि अन्य आमदारांनी केली होती. मात्र शुक्रवारी रात्री पर्यंत ही परवानगी मागे न घेतल्याने हे नियोजित आंदोलन होणार हे आता निश्चित झाले आहे. रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हे काम चालू ठेवण्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेने ठरवीले आहे.
गोयांत कोळसो नाका या संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गोवा सरकार लोकांची गरजेची मागणी फेटाळून लावत असल्याबद्दल खेद व्यक्त करताना सरकारची ही मनमानी लोक चालू देणार नाही असे म्हटले आहे. या संघटनेचे सह निमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी शनिवारी दक्षिण पश्चिम रेल्वेला एक निवेदन देऊन अजूनही या प्रकल्पाच्या अभयारण्य परिसरातील कामाला परवानगी मिळालेली नाही. जर ही परवानगी मिळाली नाही तर अन्य मार्गाचा विस्तार कुचकामाचा ठरणार असून करदात्यांचे फार मोठे नुकसान होईल याकडे लक्ष वेधून आजच्या विस्ताराचे काम तूर्त बंद ठेवावे अशी मागणी केली.
मागच्या रविवारी नेसाय येथे असेच काम करताना आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर तिथे जमा होऊन आपला विरोध दर्शविला होता.
दरम्यान आजच्या तसेच यापुढेही या आंदोलनाला गोवा फॉरवर्डचा सक्रीय पाठिंबा असेल असे या पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे गोव्यातील पर्यावरण बिघडून जाणार त्यामुळे अदानी, जिंदाल आणि वेदांता या तीन कंपन्यांना गोवा आंदण द्यायचे कारस्थान उधळून लावू असे ते म्हणाले.
कडक पोलीस बंदोबस्त
आज रात्री होणाऱ्या या आंदोलनाच्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आंदोलन स्थळावर ठेवण्यात येईल असे संकेत दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी सांगितले. सरकारच्या कामात कोणताही व्यत्यय येणार नाही याची सर्व काळजी आम्ही घेऊ असे सिंग यांनी सांगितले