तुयें येथे अँटी-ड्रोन कारखाना येणार; ५० कोटींची गुंतवणूक, ८०० नोकऱ्या निर्माण करणार
By किशोर कुबल | Published: November 24, 2023 03:23 PM2023-11-24T15:23:05+5:302023-11-24T15:24:54+5:30
गोवा सरकारने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुयें येथे हा कारखाना आणण्यासाठी कंपनीकडे सामंजस्य करार केला आहे.
किशोर कुबल, पणजी : तुयें येथे झेन टेक्नॉलॉजीजचे अँटी-ड्रोन कारखाना येणार असून तब्बल ५० कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक होणार आहे त्यानंतर ८०० नोकऱ्या निर्माण होतील. गोवा सरकारने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुयें येथे हा कारखाना आणण्यासाठी कंपनीकडे सामंजस्य करार केला आहे.
हा कारखाना ८०० जणांना नोकऱ्या देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. प्रकल्प तसेच प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सरकारने झेन टेक्नॉलॉजीजला जमीन दिली आहे. मुख्यत्वे अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल. गोव्यातील तरुणही तेथे नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन तयार असतील.
ही कंपनी निर्यातीतही आहे. दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा आहे. झेन टेक्नॉलॉजीज प्रामुख्याने शस्त्रे आणि संबंधित संरक्षण उपकरणे आणि संरक्षण प्रशिक्षण प्रणालींसाठी सिम्युलेटर प्रदान करते. तुयें येथे ४५ भूखंड मायक्रो उद्योग व १५ भूखंड मोठे उद्योग उभारण्यासाठी आहेत. उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आयटीमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. सध्या २०० कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक क्षमता आणि २००० रोजगार क्षमता असलेले ४ सूक्ष्म उद्योग आणि २ मोठे उद्योग उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले. मंत्री म्हणाले की, आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने तयार होत आहेत.