कर्ज थकबाकीदार, फसवणूक करणार्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी १ मार्चपर्यंत ॲप- मुख्यमंत्री
By किशोर कुबल | Published: December 6, 2023 03:04 PM2023-12-06T15:04:48+5:302023-12-06T15:05:19+5:30
सहकारी पतसंस्थांना सतर्क करणार
पणजी: कर्ज थकबाकीदार, सहकारी पतसंस्था तसेच बँकांची फसवणूक करणार्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी १ मार्चपर्यंत ॲप आणले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
साखळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की,' गोवा सरकार पतसंस्था आणि बँकांसाठी कर्ज थकबाकीदार आणि फसवणूक करणार्यांवर नजर ठेवण्यासाठी विशेष मोबाइल ॲप्लिकेशन (अॅप) सुरू करणार आहे. हे ॲप १ मार्च २४ पर्यंत आणले जाईल. कर्ज थकबाकीदार आणि फसवणूक करणाऱ्यांबद्दल सावध होण्यासाठी पतसंस्था आणि बँकांना हे ॲप मदत करेल.'
दरम्यान, अनेकजण विविध बँकांमधून तसेच पतसंस्थांमधून कर्ज उचलतात आणि हप्ते वेळेवर भरत नाहीत. थकबाकी राहिल्याने बँकांची बिगर उत्पादक मालमत्ता (एनपीए) वाढते व बँकांच्या व्यवहारांवर परिणाम होतो. अनेक पतसंस्था तसेच बँका यामुळे डबघाईस आलेल्याआहेत व काही बंदही पडलेल्या आहेत. या ॲपमुळे विविध पतसंस्था किंवा बँकांची फसवणूक करण्याच्या घटनांना आळा बसेल.