मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी चार नगरसेवकांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 08:44 PM2019-06-25T20:44:53+5:302019-06-25T20:45:00+5:30

नंदादीप राऊत यांनी नगराध्यक्षपदासाठी तर रिमा सोनुर्लेकर यांनी उपनगराध्यक्षपदासाठी केले दोन - दोन अर्ज दाखल

The application for four municipal corporators for municipal corporation and sub-head of municipal corporation | मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी चार नगरसेवकांचे अर्ज

मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी चार नगरसेवकांचे अर्ज

Next

वास्को: दक्षीण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेच्या रिक्त नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची जागा भरून काढण्यासाठी बुधवारी (दि.२६) बैठक बोलवण्यात आलेली असून ह्या दोन्ही पदासाठी प्रत्येकी चार नगरसेवकांनी अर्ज भरला आहे. नगराध्यक्ष पदासाठी मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक नंदादीप राऊत, यतीन कामुर्लेकर, सैफुल्ला खान व रोचना बोरकर ह्या नगरसेवकांनी अर्ज भरला आहे तर उपनगराध्यक्ष पदासाठी रिमा सोनुर्लेकर, श्रीधर म्हार्दोळकर, लीयो रॉड्रीगीस व मुरारी बांदेकर यांनी अर्ज भरला आहे.


दोन आठवड्यापूर्वी नगराध्यक्ष क्रितेश गावकर व उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्यावर अविश्वास ठराव संमत केल्यानंतर मुरगाव नगरपालिकेच्या ह्या दोन्ही खुर्च्या रिक्त झाल्या होत्या. नवीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका संचालकांनी २६ जून रोजी बैठक बोलवण्यात आली असून ह्या दोन्ही पदासाठी मंगळवारी (दि.२५) अर्ज भरण्याचा वेळ देण्यात आला होता. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी मुरगाव नगरपालिकेतील प्रत्येकी चार नगरसेवकांनी अर्ज भरलेले असून यात नंदादीप राऊत यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर रिमा सोनुर्लेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी दोन दोन अर्ज भरलेले आहेत. बुधवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात दोन्ही पदासाठी निवडणूक घेण्याकरीता बैठक घेण्यात येणार असून मडगावचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुरगाव चे पुढचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोण बनणार यावर अनेकांचे लक्ष वेधून राहीलेले आहे, कारण सदर निवडणूक भाजप विरुद्ध भाजप होणार असल्याचे समजते.

नगराध्यक्षासाठी अर्ज दाखल केलेले नगरसेवक नंदादीप राऊत व यतीन कामुर्लेकर हे वास्कोचे भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थक आहेत तर नगरसेविका रोचना बोरकर व सैफुल्ला खान यांचा यापूर्वी मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष असलेले (मंत्री मिलींद नाईक यांचे समर्थक) क्रितेश गावकर यांच्या गटाला पाठींबा होता. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरलेले नगरसेवक रिमा सोनुर्लेकर व श्रीधर म्हार्दोळकर हे सुद्धा वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थक असून लीयो रॉड्रीगीस व मुरारी बांदेकर हे नगरसेवक मंत्री मिलींद नाईक यांचे समर्थक आहेत. यामुळे बुधवारी मुरगाव नगरपालिकेत होणार असलेली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक भाजप विरुद्ध भाजप होणार अशी चर्चा सध्या चालू आहे.


निवडणूकीसाठी अर्ज भरलेल्या नगरसेवकांना तो मागे घेण्यासाठी बुधवारी बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळ देण्यात येणार असून ह्या दोन्ही पदासाठी रिंगणात उतरलेल्या नगरसेवकांपैंकी काही जण आपला अर्ज मागे घेण्याची दाट शक्यता आहे. मुरगाव नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बुधवारी कोण बसणार याबाबत विविध प्रकारची सध्या चर्चा चालू असून निवडणूकीनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार.

नंदादीप राऊत बनू शकतात मुरगाव नगरपालिकेचे ५१ वे नगराध्यक्ष
बुधवारी मुरगाव नगरपालिकेत होणार असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत जो जिंकणार आहे तो मुरगाव नगरपालिकेतील ५१ वा नगराध्यक्ष म्हणून इतिहासात नोंद होणार आहे. सदर निवडणूकीत कोण नगराध्यक्ष बनणार याबाबत सध्या विविध प्रकारची चर्चा चालू असली तरी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थन असलेले नगरसेवक नंदादीप राऊत मुरगावचे पुढचे नगराध्यक्ष बनणार अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच मुरगाव नगरपालिकेचे पुढचे उपनगराध्यक्ष कोण बनणार याबाबत सुद्धा चर्चा चालू असून आमदार कार्लुस आल्मेदा यांचेच समर्थन असलेल्या नगरसेविका रिमा सोनुर्लेकर पुढच्या उपनगराध्यक्षा बनणार असल्याचे सध्याच्या स्थितीत दिसून येत असून खरे काय ते मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: The application for four municipal corporators for municipal corporation and sub-head of municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.